गणेश वासनिक, लोकमत न्यूज नेटवर्क, अमरावती : गडचिरोलीमधील सिरोंचा तालुक्यातील सोमा वेलादी या ‘माडिया गोंड’ जमातीच्या आदिवासी युवकाने स्वतःचा जीव धोक्यात घालून ९ नोव्हेंबर १९२४ रोजी तत्कालीन सेंट्रल प्रोव्हिन्सेसच्या चांदा डिव्हिजनचे उपवनसंरक्षक एच. एस. जॉर्ज यांची वाघाच्या जबड्यातून सुटका केली होती. याबद्दल सोमाला ब्रिटिश राजसत्तेने सर्वोच्च पदक अल्बर्ट मेडल, चांदीचे आर्मलेट, ४५ एकर जमिनीची सनद बहाल केली. या घटनेला ९९ वर्षे झाली तरीही ४५ एकर जमिनीचा ताबा सोमा वेलादीच्या वारसांना मिळालेला नाही. त्यामुळे ट्रायबल फोरमचे संस्थापक अध्यक्ष ॲड. प्रमोद घोडाम यांनी पुढाकार घेऊन भारत सरकारला पत्रव्यवहार केलेला आहे.
वन अधिकारी जाॅर्ज हे घनदाट वनक्षेत्राची पाहणी करीत होते. झुडपात दबा धरून असलेल्या वाघाने अचानक त्यांच्यावर झेप घेतली. सोमा वेलादीने त्यावेळी बंदुकीच्या दस्त्याने वाघाच्या माथ्यावर प्रहार केले. जाॅर्जला रक्तबंबाळ अवस्थेत खांद्यावर उचलून सोमाने दोन मैल पार करून सुरक्चांिठिकाणी नेले. नंतर नागपूरच्या इस्पितळात दाखल केले. उपचारानंतर त्याचे प्राण वाचले. या धाडसामुळे ‘अल्बर्ट मेडल’ सेंट्रल प्रोव्हिन्सेसचे गव्हर्नर सर फ्रँक स्ले यांच्या हस्ते सोमाला नागपुरात प्रदान करण्यात आले.
४५ एकर जमीन कुठली आहे?
उपचारानंतर बरे झालेल्या जाॅर्ज यांनी सोमा वेलादीला वनविभागामार्फत जमिनीची सनदही मिळवून दिली. त्यात १५ एकर - मुरवाल फाॅरेस्ट व्हिलेज, १० एकर जार्जपेटा फाॅरेस्ट व्हिलेज, २० एकर कम्पार्टमेंट २१ आणि ३१ सिरोंचा रेंजमधील प्राणहिता नदीजवळ अशी एकूण ४५ एकर जमिनीची सनदवर नोंद आहे.
सोमाच्या पराक्रमाची दखल ब्रिटिश राजसत्तेने घेतली. लंडन गॅझेटने १२ मे १९२५ रोजी नोंद केलेली आहे. मात्र, भारतीय माणसाच्या धाडसाची नोंद भारतीय प्रशासनाच्या दप्तरी नाही, हे दुर्दैव आहे. - ॲड. प्रमोद घोडाम, संस्थापक अध्यक्ष, ट्रायबल फोरम