अमरावती : एनी डेस्क या ॲपचा गैरवापर करून महिलेचे पळविलेले ९९ हजार ८६७ रुपये सायबर पोलिसांनी तक्रार दाखल होताच २४ तासांच्या आत परत मिळवून दिले.
अश्विनी ससनकर (रा. साईनगर) यांनी २१ मे रोजी ऑनलाईन वस्तू विकत घेतली होती. ती खराब निघाल्याने ३ जून रोजी कस्टमर केअर क्रमांक शोधून कॉल केला असता, त्यांना ॲप इन्स्टॉल करायला सांगितले. ते करताच संपूर्ण मोबाईलचा ताबा सायबर गुन्हेगाराने घेतला व ओटीपीचा वापर करून प्रथम ५७,०३५, नंतर ४२,०२६ व अखेरीस ८०६ असे एकूण ९९,८६७ रुपये बँक खात्यामधून वळते केले. हे लक्षात येताच सायबर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. पोलीस निरीक्षक सीमा दाताळकर यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र सहारे, नाईक संग्राम भोजने व गजानन पवार यांनी तांत्रिक तपास करून व ऑनलाईन ट्रेडिंग करणाऱ्या कंपनीच्या नोडल अधिकाऱ्याशी संपर्क साधून २४ तासांच्या आत रक्कम मिळवून दिली.
या कामगिरीबद्दल फिर्यादी अश्विनी ससनकर यांनी सोमवारी पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह, पोलीस उपायुक्त विक्रम साळी, सायबरच्या पोलीस निरीक्षक सीमा दाताळकर, सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र सहारे, नाईक संग्राम भोजने यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.