अमरावती : तिच्या डोळ्यात मोठे होण्याचे स्वप्न होते. ते स्वप्न साकारण्यासाठी तिने घर सोडले. परतवाड्यालगतच्या एका आश्रमशाळेत प्रवेश घेतला. मात्र, एका नराधमाची वाईट नजर तिच्यावर पडली. त्याने तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. त्या पाशवी अत्याचारामुळे तिला अतिरक्तस्राव झाला. त्यातच तिचा अकाली मृत्यू झाला. याप्रकरणी तब्बल सव्वा चार वर्षांनंतर २९ जून रोजी डीएनए अहवालावरून त्या नराधमाविरुद्ध अनैसर्गिक अत्याचार, सदोष मनुष्यवध व पोस्को अन्वये गुन्हा दाखल केला. नामदेव बळीराम दहिकर (३९, रा. म्हसोना) असे अटक आरोपीचे नाव आहे.
मेळघाटातील १४ वर्षीय मुलगी सन २०१९ मध्ये परतवाड्यालगतच्या एका आश्रम शाळेत सातव्या वर्गात शिकत होती. १७ फेब्रुवारी २०१९ रोजी अचानक तिच्या छातीत व पोटात दुखत असल्याने उपचारासाठी तिला उपजिल्हा रुग्णालय अचलपूर व तेथून जिल्हा रुग्णालय अमरावती येथे दाखल केले गेले. जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली. त्याप्रकरणी परतवाडा पोलिसांनी १८ फेब्रुवारी २०१९ रोजी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.
अहवालातून निष्पन्न
तत्कालीन चौकशी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक संजय गायकवाड यांनी चौकशी दरम्यान २१ फेब्रुवारी २०१९ रोजी आश्रम शाळेच्या जवळच वीटभट्टीवर काम करणाऱ्या नामदेव बळीराम दहिकर याचे संशयित म्हणून रक्ताचे नमुने घेतले. मृत मुलगी व संशयिताचे रक्तनमुने अमरावतीच्या न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. तो अहवाल सव्वा चार वर्षांनंतर परतवाडा पोलिसांना पाठविण्यात आला. त्यातून नामदेवनेच त्या मुलीवर अनैसर्गिक अत्याचार केल्याचे निष्पन्न झाले.
अहवालापूर्वीच समरी मंजूर
पोलिस अधिकाऱ्यांनी ऑगस्ट २०१९ मध्ये हे प्रकरण मंजुरीकरिता एसडीएमकडे पाठविले. एसडीएम अचलपूर यांनी या आकस्मिक मृत्यू प्रकरणात रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण आणि बीपी कमी झाल्याने मृत्यू , या सबबीखाली १० जून २०२० रोजी प्रकरण फाइलबंद केले.
डीएनए मॅच झाला पण...
या प्रकरणातील डीएनए अहवाल २० जून २०२० ला परतवाडा पोलिसांना प्राप्त झाला. यात त्या मृतक मुलीचा व संशयिताचा डीएनए मॅच झाला असल्याचे नमूद असूनही पोलिसांकडून पुढील कारवाई केली गेली नाही. दरम्यान, या प्रकरणात संबंधित शिक्षण संस्थेने २०२२ मध्ये उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली. यावर प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धारणी शवविच्छेदन अहवाल, व्हिसेरा अहवाल आणि डीएनए तपासणी अहवालाची मागणी परतवाडा पोलिसांकडे केली.
गंभीर बाब आली निदर्शनास
त्या अहवाल मागणीनंतर येथील पोलिस अधिकाऱ्यांनी सविस्तर घटनाक्रमाची नोंद सीसीटीएनएस प्रणालीवर घेऊन २९ जून रोजी गुन्हा नोंदविला. अपर पोलिस अधीक्षक या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करणार आहेत.
डीएनए अहवालाच्या अवलोकनानंतर घटनेचा उलगडा झाला आहे. डीएनए मॅच झाल्यामुळे प्रकरणातील संशयित नामदेव दहिकर यास अटक करण्यात आली असून गुन्हा दाखल केला.
संदीप चव्हाण, ठाणेदार, परतवाडा.