अमरावती : तीन महिन्याच्या एका गर्भवती महिलेला रक्ताची गरज असल्याची माहिती मिळताच हैदरपुरा येथील रहिवासी व्यापारी इमरान उलहक इजहार उलहक यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात जाऊन रक्तदान केले. इमरान यांच्या या रक्तदानामुळेच २.८ ग्रॅम हिमोग्लोबिन असलेल्या अनिता इवने या २४ वर्षीय महिलेला नवे जीवनदान मिळाले आहे. रक्तदानातून इमरान उलहक यांनी मानवतेचा परिचय समाजाला करून दिला आहे.
अचलपूर तालुक्यातील सालेपूर पांढरी येथील अनिता इवने या तीन महिन्यांच्या गर्भवतीची प्रकृती बिघडल्याने तिला २४ मे रोजी जिल्हा स्त्री रुग्णालय (डफरीन) येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. येथे अनिताची तपासणी केली असता तिचे हिमोग्लोबिन २.८ ग्रॅम असल्याचे आढळून आले. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये अनिताला रक्ताची नितांत गरज होती. परंतु, सध्या जिल्ह्यात सर्वत्र रक्ताचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा असल्याने अनिताला आवश्यक ए पॉझिटिव्ह रक्तगटाचे रक्त मिळविणे कठीण जात होते.
अशातच जिल्हा सामान्य रुग्णालयाने तयार केेलेल्या रक्तदात्यांच्या एका ग्रुपमध्ये ही माहिती देण्यात आली. मेळघाटसह जिल्ह्याच्या इतर भागातील गरजू रुग्णांना या ग्रुपच्या सदस्यांकडून आवश्यक रक्त पोहोचविण्याचा प्रयत्न केला जातो. डफरीन रुग्णालयातील समुपदेशक प्रकाश खडके यांनीही रक्तासाठी अनेक रक्तदात्यांशी संपर्क साधला. यावेळी इमरान उलहक इजहार उलहक यांना याची माहिती मिळताच त्यांनी तातडीने रक्तदानासाठी होकार दिला आणि त्यानंतर त्यांनी २५ मे रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे अनिता इवने यांच्यासाठी रक्तदान केले. या रक्तामुळे अनिता हिला नवे जीवनदान मिळाले असून, तिच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याची माहिती विस्तार अधिकारी कविता पवार यांनी दिली.