अमरावती - स्थानिक विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय येथे मंगळवारी ब्रेन ट्यूमरची जटिल शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली. सहा तास चाललेल्या या शस्त्रक्रियेमुळे एका ६६ वर्षीय महिलेला नवे जीवदान मिळाले आहे. विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात अमरावती जिल्ह्याबरोबरच विभागातील पाचही जिल्ह्यांमधून मोठ्या संख्येने रुग्ण हे उपचारासाठी दाखल होत असतात.
बुलढाणा जिल्ह्यातील एका ६६ वर्षीय महिलेला ब्रेन ट्यूमरचा त्रास असल्याने तिला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. यावेळी महिलेचे सीटीस्कॅन व एमआरआय करण्यात आले. यामध्ये सदर महिलेच्या छोट्या मेंदूला गाठ असल्याचे आढळून आले होते. त्यामुळे महिलेचे प्राण वाचविण्यासाठी डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला; परंतु ही शस्त्रक्रिया गुंतागुंतीची होती.
सुपरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नरोटे व विशेष कार्य अधिकारी डॉ. मंगेश मेंढे, आरएमओ डॉ. हिवसे, डॉ. माधवी कसदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली न्यूरोसर्जन डॉ. अभिजित बेले, डॉ. अमोल ढगे, डॉ. आनंद काकानी, डॉ. स्वरूप गांधी, बधिरीकरण तज्ज्ञ डॉ. बाळकृष्ण बागवाले, डॉ. नंदिनी देशपांडे यांनी ही शस्त्रक्रिया यशस्वी केली. परिचारिका दीपाली देशमुख, मनीषा राऊत, तेजल बोंडगे, संजय शिंदे, रोशन वरघट, विजय गवई यांनीही शस्त्रक्रियेत मोलाचे योगदान दिले.