श्यामकांत पाण्डेय
अमरावती : पती-पत्नी, दोन मुले, दोन सुना व चार नातवंडे अशा दहा जणांच्या आदिवासी कुटुंबाने ४० फूट खोल विहीर कुठलेही आधुनिक संसाधन न वापरता ५६ तासांमध्ये आणखी तीन फुटांपर्यंत खोदली आहे. तथापि, सात दिवसांच्या त्यांच्या या कठोर श्रमाला मेळघाटात आढळणारा काळा पाषाण आडवा आला आणि पुढील खोदकाम थांबले. हाडे मोडून काढणारी मेहनत घेतल्यानंतर आता त्यांचे डोळे शासनाकडे मदतीसाठी लागले आहेत.
वडिलोपार्जित पावणेदोन एकर शेती कसणारे कोंडवाडी येथील अल्पभूधारक शेतकरी लालू कालू जावरकर यांनी कृषिकोन्नतीचे स्वप्न पाहिले खरे; पण त्यांच्या वाट्याला अद्याप हिरवं सोनं आलेलं नाही. विहीर बांधून चांगले उत्पन्न घेण्याची त्यांची मनीषा होती. २०१९ मध्ये इमर्जन्सी या योजनेखाली ग्रामपंचायतीमार्फत विहिरीचे खोदकाम लालू सावरकर यांनी सुरू केले. या योजनेमध्ये लाभार्थींना स्वतः खर्च करावा लागतो. त्याअनुषंगाने लालू यांनी आपली मुले शिवचरण व शिवलाल यांच्यासह त्यांच्या सुना उमरती व पूर्ण यांच्या मदतीने विहिरीचे खोदकाम केले. काम जास्त खोलीपर्यंत गेल्यानंतर पाच हजार रुपये प्रतिहात याप्रमाणे मजुरांकरी काम त्यांनी करून घेतले. तथापि, सरावलेले मजूर आठवडा होत नाही तोच अनेक हात खोदकाम करीत असल्याने त्यांची देणी देण्यासाठी लालू यांचे अक्षरशः दिवाळी निघाले.