नरेंद्र जावरे चिखलदरा (अमरावती) : दाट धुक्यामुळे घाट वळणातील रस्ता न दिसल्यामुळे चार चाकी चक्क तीस फूट दरीत कोसळली.या अपघातात वाहनातील चौघे जखमी झाले असून त्यांच्यावर परतवाडा अमरावती येथे खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. परतवाडा धारणी मार्गावरील घटांगनजीक शुक्रवारी सायंकाळी ७.३० वाजता सदर घटना घडली. दैव बलवत्तर म्हणून मोठा अनर्थ टळला.
श्रीकांत रमेश देशमुख निलेश नत्थुजी साळुंके दोघे रा अमरावती, अतुल रमेश उमरकर रा. अकोला, विवेक किसनराव मुदगल रा. अचलपूर असे अपघातातील जखमींची नावे आहेत. हे चौघे एम एस २७ डी ए २९३२ क्रमांकाच्या चार चाकी वाहनाने धारणीवरून परतवाडाकडे येत असताना सोमवारी सायंकाळी ७.३० वाजता घटांग नजीकच्या वळणावर दाट धुक्यामुळे मार्ग दिसत नसल्यामुळे वळणावरून थेट २५ ते ३० फूट खोल दरीत चार चाकी सरळ कोसळली. चिखलदरा पोलिसांनी घटनेची नोंद घेतली आहे. पुढील तपास ठाणेदार आनंद पीदूरकर, श्रीकांत खानंदे व कर्मचारी करीत आहे.