अमरावती : ती आपल्या मित्रासमवेत पंचवटीकडे येत होती. इतक्यात समोरील कारने अचानक ब्रेक दाबल्याने धडक होऊ नये म्हणून तिच्या मित्राने करकचून ब्रेक दाबले. मात्र, त्यामुळे दोघेही दुचाकीवरून खाली कोसळले. इतक्यात एक शहर बस आली अन् तिला चिरडून गेली. काही कळायच्या आत शहर बसचे चाक तिच्या डोक्यावरून गेले अन् क्षणात होत्याचे नव्हते. हृदयाला थरकाप सोडविणारा हा अपघात येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर सोमवारी दुपारी १ च्या सुमारास घडला. नेहा इंगोले (२०, रा. रेवसा) असे मृत तरुणीचे नाव आहे.
नेहा ही विदर्भ ज्ञानविज्ञान महाविद्यालय येथील बी.एससी. अभ्यासक्रमाची विद्यार्थिनी आहे. सोमवारी दुपारी ती मित्र मिहिर महल्ले (वय २१) याच्यासोबत दुचाकीने जात होती. या वेळी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर त्यांच्या दुचाकीसमोरील चारचाकी वाहनाने अचानक ब्रेक दाबल्याने मिहीर यानेही दुचाकीचे ब्रेक दाबताच दोघेही दुचाकीवरून खाली पडले. या वेळी पाठीमागून येत असलेल्या शहर बसचे चाक नेहाच्या डोक्यावरून गेले. त्यामुळे ती गंभीररीत्या जखमी झाली होती. या वेळी काही प्रत्यक्षदर्शींनी नेहा व मिहीरला खासगी रुग्णालयामध्ये हलविले. दरम्यान, या प्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी संबंधित शहर बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
लहानपणापासून ती राहत होती आत्याकडे
तेथे डॉक्टरांनी नेहाला मृत घोषित केले. त्यामुळे तिला इर्विन रुग्णालयात आणण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून तिच्या मृत्यूला दुजोरा दिला. नेहाचे वडील हे अकोला जिल्ह्यातील आकोट येथे शासकीय नोकरीवर आहेत. आई नसल्याने ती लहानपणापासूनच रेवसा येथे तिच्या आत्याकडे राहत होती. मिहीर महल्ले याच्या नातेवाईकांनी मिहीरला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
मार्ग बनला अपघातप्रवण
पंचवटीपासून विदर्भ महाविद्यालयापर्यंत दुतर्फा सिमेंट रोडचे बांधकाम सुरू आहे. तूर्तास राठीनगरपासून गाडगेबाबा मंदिरापर्यंतच्या बाजूने बांधकाम सुरू आहे. त्यामुळे राठीनगरमधून पंचवटीकडे येत असताना उजव्या बाजूकडील रस्त्याचा वापर करावा लागतो. त्यामुळे त्या रस्त्यावर वाहनांची मोठी गर्दी होते. तेथील अपघात टाळण्यासाठी संबंधित कंत्राटदाराने कुठलीही उपाययोजना केलेली नाही.