अमरावती : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांविषयी संवेदना व्यक्त करण्यासाठी व शेतकरीविरोधी कायद्यांचा विरोध करण्यासाठी पंचवटी चौकातील डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्याजवळ रविवारी एक दिवसाचा उपवास करण्यात आला. संयुक्त किसान मोर्चा, आपुलकी परिवार व राष्ट्रीय ओबीसी किसान महासंघाद्वारा हे अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. यामध्ये अनेक जण सहभागी झाले होते.महाष्ट्रात ३७ वर्षांपासून अखंडपणे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या ही राष्ट्रीय आपत्ती समजून उपाययोजना करायला पाहिजे होती. दुर्दैवाने तसे झालेले नाही. त्यामुळे नागरिक म्हणून सर्वांची जबाबदारी वाढते. या पार्श्वभूमीवर १९ मार्चचे उपोषण शेतकऱ्यांविषयी सहवेदना व्यक्त करणारे ठरले, हे आंदोलन शेतकरीविरोधी कायद्यांचा निषेध करणारे असल्याचे उपस्थितांनी सांगितले. आंदोलनात प्रकाश साबळे, संजय पांडव, प्रमोद कुचे, दिलीप काळे, हरिभाऊ मोहोड, पौर्णिमा सवाई, विजय विल्हेकर, धनंजय काकडे, नितीन पवित्रकार, धनंजय तोटे, नीलेश उभाड, राहुल तायडे, अशिष काळमेघ, मिलिंद वंजारी, किरण महल्ले, अमोल भारसाकळे यांच्यासह अनेक नागरिक व सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
१९ मार्च १९८६ ला जाहीर झाली पहिली शेतकरी आत्महत्या
साहेबराव करपे हे यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण या गावचे शेतकरी होते. शेती परवडत नाही, दरवर्षी तोटाच होतो. म्हणून अस्वस्थ होते, १९ मार्च १९८६ रोजी पत्नी मालती व चार अपत्यांना घेऊन ते पवणार आश्रमात गेले. सविस्तर पत्र लिहिले. रात्री जेवणात विषारी औषध कालवून संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केली. या घटनेला ३७ वर्षे होतात. म्हणून उपवासासाठी १९ मार्चची तारीख निवडण्यात आल्याचे धनंजय काकडे म्हणाले.