लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : ग्रामीण भागातून अमरावती येथे येणाऱ्या विद्यार्थ्यांकडे बनावट पास निदर्शनास आली. महेंद्र कॉलनी येथील १९ वर्षीय युवक बनावट पास बनवून देत असल्याचे त्या विद्यार्थ्याने सांगितले. त्यावरून गाडगेनगर पोलिस ठाण्यात त्या युवकाविरुद्ध तक्रार देण्यात आली. ऑगस्टमधील तक्रारीवरून पोलिसांनी २८ ऑक्टोबर रोजी या प्रकरणी गुन्हा दाखल केला. त्यापूर्वी याबाबीच्या मुळाशी जाण्यासाठी जिल्ह्यातील १३,५०० प्रवास सवलत पास एसटी महामंडळाच्या विविध पथकांनी तपासून काढल्या.
पोलिस सूत्रांनुसार, शिवजित गजानन पवार (१९, रा. महेंद्र कॉलनी, अमरावती) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. अमरावती आगारात कार्यरत महिला अधिकाऱ्याने याप्रकरणी गाडगेनगर पोलिस ठाण्यात १६ ऑगस्टला तक्रार नोंदविली. त्या तक्रारीनुसार, माहुली येथून अमरावतीकरिता बसलेल्या एका विद्यार्थ्यांची पासची तपासणी केली तेव्हा संशय आल्याने ती पास जवळ बाळगून त्या विद्यार्थ्याला वाहकाने आगारातील महिला अधिकाऱ्याच्या समक्ष उपस्थित केले. पास बनावट असल्याची खात्री झाल्यावर त्या विद्यार्थ्यांची चौकशी केली असता, शिवजित पवारसह काही जण हा तशा प्रकारच्या बनावट एसटी पास बनवून देतो, असे पुढे आले.
२२-२३ ऑगस्टला तपासणी मोहीमजिल्ह्यातील १३ हजार ५०० हून अधिक विद्यार्थी पासमधून काही बनावट आहेत का, याची तपासणी मोहीमच अमरावती आगाराने २२- २३ ऑगस्ट रोजी राबविली. त्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक आगाराच्या ठिकाणी तपासणी पथके पाठविण्यात आली. एवढ्या मोठ्या संख्येतून चार ते पाच पास या बनावट आढळून आल्याच. त्यामुळे संशयाच्या आधारे अमरावती आगाराकडून गाडगेनगर पोलिसांत तक्रार देऊन कारवाईची मागणी करण्यात आली.
"काही विद्यार्थ्यांकडे रंगीत, झेरॉक्स स्वरूपात तसेच काही पास या दुसऱ्या ठिकाणाहून छपाई करून घेतल्याचे निदर्शनास येते का, याची तपासणी पथकाने केली. विद्यार्थी अल्पवयीन असल्याने यामागील सूत्रधारांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य होते. पोलिसांनी याबाबत पुढील कारवाई करावी."- नीलेश बेलसरे, विभाग नियंत्रक, अमरावती आगार (एसटी)