अमरावती : १० दिवसांच्या धामधुमीनंतर सर्वांचे लाडके गणपती बाप्पाला निरोप देऊन विजर्जित केले जाते. त्याआधी समाजातील प्रतिष्ठित लोकांसह नातेवाईक, मित्रमंडळींना महाप्रसाद रुपात जेवणाचे आमंत्रण दिले जाते. ही परंपरा झाली असून यापेक्षा वेगळा उपक्रम येथील वानखडे परिवाराने राबविला. अनाथाश्रमातील मुलांना भोजनासह वॉटर बॉटल भेट देऊन त्यांच्या आनंदात भर घातली.
गणोशोत्सवादरम्यान लोक आपल्या जवळच्या लोकांना घरी बोलवून जेवण देतात. अनेक प्रतिष्ठित लोकांनाही जेवण दिलं जातं. यातही काही लोक सामाजिक बांधिलकी जपत आणि आपली समाजाप्रति जबाबदारी दाखवत वेगळं काहीतरी करतात. असंच काहीसं ऋतिक वानखडे याबाबत सांगता येईल.
17 सप्टेंबर 2024 रोजी राजेंद्र वानखडे यांनी आपल्या घरच्या गणपतीचे जेवण अनाथ आश्रमातील मुला-मुलींना देण्याचे ठरविले. ही संकल्पना त्यांच्या परदेशात राहणाऱ्या मुलाची होती. राजेंद्र वानखडे यांचा मुलगा ऋतिक वानखडे हा अमरावती येथील रहिवासी असून सध्या तो थायलॅंड येथे यूएफसी फेडरेशनमध्ये नोकरी करीत आहे.
जीवनात मनातील श्रद्धेला फार मोठे स्थान आहे. ऋतिकने थायलॅंड येथून गोकुळ अनाथ आश्रमामध्ये गणपतीचे जेवण देण्याची तयारी दर्शविली. त्याअनुषंगाने त्याच्या आई वडिलांनी मुलाची इच्छा पूर्ण करण्याच्या दृष्टीने गणपतीचे संपूर्ण जेवण तयार करून अमरावती येथील गोकुळ अनाथ आश्रममध्ये अनाथ व निराधार मुलांना जेवण देऊन समाजासमोर आदर्श निर्माण केला.
अनाथ आश्रमातील मुलांना केवळ जेवण देऊनच ते थांबले नाही तर जेवणानंतर संपूर्ण अनाथ मुलांना भेट म्हणून वाटर बॉटलचे वाटप करण्यात आले. अनाथ आश्रम ट्रस्टच्या संचालिका गुंजनताई यांनी आम्हाला मुलांची वेळ व तारीख उपलब्ध करून देण्यामध्ये मदत केली त्यामुळे आश्रमाचे व त्यांचे आभारी आहोत, असं राजेंद्र वानखडे म्हणाले.