अमरावती : ‘आय लव यू. तेरा फोटो देखके तेरेपें दिल आया है, जानेमन पैसा मत दे, सिर्फ एक बार तेरेसाथ खाना खाना चाहता हू’ असा व्हाईस मॅसेज टाकून एका बॅंक सहव्यवस्थापक महिलेचा विनयभंग करण्यात आला. ७ एप्रिल रोजी ४.२० ते ५.४२ दरम्यान तिला एकुण आठ व्हाईस मॅसेज करण्यात आले. त्यात तिला अश्लिल शिविगाळ देखील करण्यात आली. याप्रकरणी शहर कोतवाली पोलिसांनी आरोपी राजेश मिश्रा (रा. ठाणे) याच्याविरोधात १३ एप्रिल रोजी रात्री ९ च्या सुमारास गुन्हा दाखल केला.
येथील एका बॅंकेत सहायक व्यवस्थापक असलेल्या महिलेकडे बॅंक शाखांच्या नुतनीकरणाची जबाबदारी आहे. अशाच एका बॅंक शाखेच्या नुतनीकरणाचे काम ठाणे येथील एका कंपनीकडे असून, त्या कंपनीचा प्रतिनिधी म्हणून आरोपी राजेश मिश्रा काम पाहतो. त्या फर्मचा प्रतिनिधी म्हणून सदर महिला व्यवस्थापकाची त्याच्यासोबत ओळख झाली. त्यातून त्याने ७ एप्रिल रोजी तिला व्हाईस मॅसेज पाठविला. तो वृध्द इंजिनिअर आणखी पाच दहा वर्षे जीवंत राहिल. पण तुझा फोटो पाहून माझे मन तुझ्यावर आले आहे, असे त्यात नमूद होते. ते एकुण आठ व्हाईस मॅसेज एैकताच महिलेने ते मॅसेज आरोपीने डिलिट करण्यापुर्वी आपल्या मित्राला पाठविले. तर थोडयाच वेळात आरोपीने ते मॅसेज डिलिट केले.
अन्य दुसऱ्यालाही पाठविला मॅसेज
आरोपी राजेश मिश्रा एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने त्या बॅंकर महिलेच्या सहकाऱ्याच्या व्हॉटसॲपवर त्याचदिवशी सायंकाळी ६.४१ ते ६.४४ दरम्यान व्हाईस मॅसेज पाठविला. त्यात महिलेसह तिचा अन्य एक सहकारी गायब असल्याने काम कसे करायचे, ते समजत नसल्याचे म्हटले. असे काम करून दाखवेल, की तुम्ही विचार करू शकणार नाही म्हणत बॅंकर महिलेशी एक मिटिंग करवून द्या, तिला एकटीला एकदा पाठवा, असे तो व्हाईस मॅसेजमधून म्हणाला. यातून आरोपीने आपल्याशी लैंगिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी व्हाईस मॅसेज पाठविल्याची महिला बॅंकरची खात्री पटली. तिने ती बाब तिच्या वरिष्टांनी सांगितली.