अमरावती : विविध पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल असलेल्या टोळीप्रमुखासह चार अट्टल गुन्हेगारांना एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. १४ नोव्हेंबर रोजी पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली.
चौघेही तडीपार गुन्हेगार हे वरूड तालुक्यातील शेंदुरजनाघाट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी आहेत. टोळी प्रमुख आकाश अरुण वाघाळे (२८) व त्याचे साथीदार अमोल धनराज बोके (२८), पियुष ओमप्रकाश ढोके (२३) व केशव प्रभाकर वंजारी (२५, सर्व रा. मलकापुर, ता. वरुड) असे तडीपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत. त्यांनी शेंदुरजना घाट शहर व मलकापूर भागातील शांतताप्रिय नागरिकांच्या जिविताला व संपत्तीला गंभीर धोका निर्माण केला होता.
या टोळीने लोकांना धमकविणे, घातक शस्त्रासह जातीय तणाव निर्माण करणे, लोकांवर हमला करणे, बलात्कार करणे असे गंभीर स्वरुपाचे कृत्य केले होते. त्यांच्याविरूद्ध कुणीही उघडपणे पोलीस स्टेशनला तक्रार देण्यास तयार होत नव्हते. त्यामुळे शेंदुरजना घाटच्या ठाणेदारांनी या टोळीला हद्दपार करण्याबाबतचा प्रस्ताव पोलीस अधिक्षक कार्यालयास सादर केला होता. त्यानुषंगाने एसपी बारगळ यांनी चौघांनाही अमरावती व नागपूर जिल्ह्यासह मध्य प्रदेशातील पांढुर्णा जिल्हा व बैतुलमधील पांढुर्णा व मुलताई तालुक्यांच्या हद्दीतून एका वर्षाच्या कालावधी करीता हद्दपार करण्याचे आदेश काढले.
यांनी केली कार्यवाही
पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ, अपर पोलीस अधिक्षक शशिकांत सातव, उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे, शेंदुरजनाघाटचे ठाणेदार सतिष इंगळे, पोलीस उपनिरिक्षक सागर हटवार, पोहेकॉ अमोल देशमुख, स्थानिक गुन्हे शाखा यांनी ही कारवाई पार पाडली.