अमरावती : सामाजिक वनीकरण विभागाच्या मोर्शी आरएफओंच्या ताब्यातील वाहन हे अमरावती येथील ग्रामीण पोलिस मुख्यालयात ‘शासकीय वाहन लपविले, आयोगाच्या हातावर दिल्या तुरी’ या आशयाचे वृत्त मंगळवारी ‘लोकमत’ने छायाचित्रासह प्रकाशित करताच हे वाहन आरएफओंनी त्वरेने तेथून हटविले आहे. मात्र हे शासकीय वाहन आता कुठे नेले? या प्रश्न अनुत्तरीत आहे. परंतु, या गंभीर प्रकरणाची निवडणूक विभागाने दखल घेतली असून याबाबत सामाजिक वनीकरणाला जाब विचारला जाणार असल्याची माहिती आहे.
सामाजिक वनीकरण मोर्शी परिक्षेत्राच्या वनपरिक्षेत्राधिकारी शीतल घुटे यांच्याकडे असलेले एमएच २७, एए ०४९७ या क्रमांकाचे वाहन निवडणूक विभागाच्या तावडीतून वाचविण्यासाठी त्यांचे पती कार्यरत असलेल्या मोटार परिवहन विभागाच्या ग्रामीण मुख्यालय येेथे १२ दिवसांपूर्वी आणून लपविले होते. निवडणूक विभागाच्या डोळ्यात धुळफेक करीत मोर्शी आरएफओंनी शक्कल लढविली. तर दुसरीकडे हे वाहन नादुरूस्त असल्याचा बनाव करण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक कार्यात वाहन आवश्यक असल्याने हे वाहन अधिग्रहीत करण्यासाठ सामाजिक वनीकरणाचे विभागीय वनाधिकारी शरद करे यांच्याकडे पत्रव्यवहार करण्यात आला होता. मात्र हे वाहन निवडणूक विभागाला नादुरूस्त आणि चालक नसल्याचे कारण सांगून देण्याचे टाळले. मात्र वाहन सुस्थितीत असताना केवळ निवडणूक कामासाठी वाहन देण्याचे टाळून चक्क ते आरएफओंनी अमरावतीच्या ग्रामीण पोलिस मुख्यालयात आणून ठेवले. तथापि, पोलिस मुख्यालयात पोलिसांचीच वाहने ठेवली जात असताना सामाजिक वनीकरणाचे वाहन कशासाठी ठेवले, हा प्रश्न कायम आहे.
सामाजिक वनीकरणाचे विभागीय अधिकारी अनभिज्ञमोर्शी आरएफओंनी परस्पर शासकीय वाहन ग्रामीण पोलिसांच्या मुख्यालयात आणून ठेवल्याच्या या धक्कादायक प्रकारापासून सामाजिक वनीकरण विभागीय अधिकारी शरद करे हे अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. सामाजिक वनीकरण, मेळघाट व्याघ्र प्रकल्प अथवा प्रादेशिक वन विभागात मुबलक जागा असताना ग्रामीण पोलिस मुख्यालयात शासकीय वाहन कशासाठी ठेवण्यात आले, याची चौकशी होणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.
पोलिस मुख्यालयातून वाहन हलविलेमोर्शी आरएफओंनी वरिष्ठांची परवानगी न घेता शासकीय वाहन हे ग्रामीण मुखयालयात आणून लपविले होते. ही बाब लोकमतनेउजेडात आणताच बुधवारी हे वाहन हलविण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे हे वाहन कुठे नेले, याबाबत संशय निर्माण हाेत आहे. गत १२ दिवसांपासून हे शासकीय वाहन लपवून ठेवले असताना आता मोर्शी आरएफओंच्या वाहनांचे लॉग बुक तपासणी करणे हे गरजचे आहे. चालक नसताना हे वाहन मोर्शी येथून अमरावतीपर्यत कोणी चालवित आणले, हा विषय संशोधनाचा आहे. आता एक-दोन दिवसात हे वाहन खासगी गॅरेजमध्ये दिसून आल्यास नवल वाटू नये, असे बोलले जात आहे.