लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : तीन-चार वर्षांपूर्वी परीक्षा संचालकांच्या टेबलवर झालेल्या शाईफेक प्रकरणाची धास्ती घेऊन परीक्षा विभागाला पक्की सुरक्षा भिंत बांधण्याचा अजब निर्णयामुळे विद्यापीठाच्या फंडाला तब्बल २३ लाखांनी चुना लागल्याची बाब गत आठवड्यात संपन्न झालेल्या सिनेट समक्ष उघड झाली आहे.
परीक्षा विभागाच्या इमारतीला भक्कम अशी सुरक्षा भिंत बांधण्यामागचा उद्देश आणि त्यावर झालेल्या खर्च व उपयोगिता यासंदर्भातील प्रश्नावर उत्तर देताना ही भिंत बांधण्याकरिता तब्बल २३ लाख खर्च झाल्याची बाब उघड झाली आहे. या प्रश्नावर बोलताना प्रा. डॉ. कुटे यांनी सभागृहाला सांगितले की, त्यांच्या महाविद्यालयात याच प्रकारची भिंत बांधण्याकरिता आठ ते नऊ लाख खर्च आला. मग विद्यापीठाला २३ लाख कसे लागले? असे कोणते मटेरियल वापरले? यावर उत्तर देताना विद्यापीठ अभियंत्यांनी सांगितले की, एकूण ३२ लाखांचे प्रस्तावित बांधकाम होते. परंतु, प्रत्यक्षात २३ लाखांत काम झाले. या कामासाठी सर्व प्राधिकारणीसमक्ष विषय सादर करण्यात आला होता. सदस्यांच्या प्रत्येक प्रश्नाला अभियंत्यांनी सखोलपणे उत्तर दिले. या चर्चेत डॉ. विधे, डॉ. प्रवीण रघुवंशी यांनी भाग घेतला. भिंतीची उपयोगिता काय? खरोखर प्रत्येक विद्यार्थ्यांची तपासणी होते का? भिंत बांधल्याने मोर्चे थांबले का? भिंत बांधल्याचा उद्देश सफल झाला का? या प्रश्नावर प्रशासन मात्र निरुत्तर होते, हे विशेष.
परीक्षा विभाग सगळ्यांसाठी खुला कुलगुरूंनी विद्यमान परीक्षा संचालक डॉ. नितीन कोळी यांना मत व्यक्त करण्यास सांगितले असता त्यांनी 'कोणालाच आडकाठी नाही. परीक्षा विभाग सगळ्यांसाठी खुला आहे,' असे प्रतिपादन करीत चर्चेवर पडदा टाकला. मात्र, सगळ्यांसाठी खुल्या असलेल्या परीक्षा विभागास सुरक्षा भितीची खरंच गरज होती का? अशी चर्चा विद्यापीठात रंगली आहे.