पोहरा बंदी (अमरावती) : चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्र अंतर्गत चांदूर रेल्वे वर्तुळातील मौजा विरूळ रोंघे गावालगत एका शेतातील विहिरीत पडलेल्या दोन ते अडीच महिन्याच्या बिबटाच्या छाव्याला ३० फूट खोल विहिरीतून काढण्यात आले.
आईपासून भटकलेले हे मादी बिबट विहिरीत पडल्याची माहिती शेतमालक कांचन सुने (रा. विरूळ रोंघे) यांना सकाळी १० च्या सुमारास दिली. चांदूर रेल्वे वन विभागाला या घटनेची माहिती मिळताच उपवनसंरक्षक चंद्रशेखरन बाला, सहायक वनसंरक्षक ज्योती पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्र अधिकारी भानुदास पवार, चांदूर रेल्वे वर्तुळ अधिकारी किशोर धोत्रे, वनरक्षक व्ही. टी. पवार, ऐश्वर्या ढोके, रजनी भुजाडे, रमेश किरपाणे, वनमजूर शरद खेकाडे, वाहनचालक संजय पंचभाई, संरक्षण मजूर आदींनी वन विभागाच्या पिंजऱ्यासह तडकाफडकी घटनास्थळ गाठले.
विहिरीची पाहणी केली असता, बिबट्याचा छावा त्या ३० फूट खोल विहिरीच्या मानेवर एका किनाऱ्यावर बसून असल्याचे निदर्शनास आले. चांदूर रेल्वे वन विभागाच्या पथकाने विहिरीत पिंजरा सोडला व एका तासात त्या पिलाला त्यात घेऊन विहिरीबाहेर सुखरूप काढण्यात यश मिळविले. त्यानंतर वन विभागाच्या वाहनातून चांदूर रेल्वे वर्तुळ कार्यालयात आणण्यात आले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सूरदुशे यांनी तपासणी करून बिबट्याचा छावा सुरक्षित असल्याचे स्पष्ट केले. चांदूर रेल्वे वर्तुळ कार्यालयात बिबट्याच्या या छाव्याला पिंजऱ्यात सुरक्षित ठेवण्यात आले आहे.