अमरावती : गत काही दिवसापासून अमरावती शहराच्या सीमेवर्ती भागात शिकारीच्या शोधात बिबट नागरिक वस्त्याकडे धाव घेत आहे. त्याच अनुषंगाने रविवारी पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर रस्ता ओलांडताना एका वाहनाने चिरडल्याने तो बिबट्या जागीच ठार झाला. याबाबत वन विभागाने घटनास्थळी धाव घेतली असून बिबट्याचा पंचनामा करून त्याला ताब्यात घेतले. त्याच्यावर वन विभागाच्या नियमावलीनुसार सोपस्कार केले जाईल, अशी माहिती वडाळीच्या वनपरिक्षेत्र अधिकारी वर्षा हरणे यांनी 'लोकमत' शी बोलताना दिली.
शहराच्या हद्दीत गत काही दिवसापासून हा बिबट्या श्वान, वरहाच्या शिकारीसाठी महादेव खोरी, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था कठोरा मार्ग, विद्यापीठ परिसर नवसारी आदी भागात आढळून आल्याचे स्पष्ट झाले बिबट्याचा शोध घेण्यासाठी वन विभाग आणि वन्यजीव प्रेमींनी संयुक्त गस्त देखील चालविली आहे. मात्र, रविवारी पहाटे झालेल्या अपघातात बिबट्याचा मृत्यू झाला. 'लोकमत' १६ ऑक्टोबर रोजीच्या अंकात ' शहराच्या सीमावर्ती नागरी वस्तामध्ये बिबट्याचा धोका' या आशयाचे वृत्त प्रकाशित केले, हे विशेष.