अमरावती : एका अल्पवयीन मुलीला रस्त्यात अडवून तिची छेड काढण्यात आली. तथा माझ्यासोबत लग्न कर, अन्यथा लग्न होऊ देणार नाही, अशी गर्भित धमकी देण्यात आली. २३ जून रोजी सकाळी १० च्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी बडनेरा पोलिसांनी २४ जून रोजी रात्री ९ च्या सुमारास स्वप्निल हरिभाऊ दारोकार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस तक्रारीनुसार, स्वप्निल दारोकार हा दोन महिन्यांपासून संबंधित अल्पवयीन मुलीला लग्नासाठी जबरदस्ती करत आहे. तिचा पाठलाग करून तिला वारंवार त्रासदेखील देत आहे. तो एवढ्यावरच न थांबता तिला फोन कॉल करून तुझे लग्न होऊ देणार नाही, अशी गर्भित धमकी देत आहे. दरम्यान, २३ जून रोजी ती अल्पवयीन मुलगी ट्यूशनहून परत जात असताना बडनेरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका ठिकाणी तो तिच्यासमोर आला. तुझ्यावर प्रेम करतो, माझ्यासोबत लग्न कर, असेही तो तिला म्हणाला. त्यामुळे ती प्रचंड घाबरली. काहीही न बोलता तिने घर गाठले. त्यावेळी तिने सामाजिक बदनामीपोटी कुणाला काहीही सांगितले नाही. मात्र, आता त्याचा बंदोबस्त न केल्यास तो पुन्हा त्रास देईल, या भीतीपोटी तिने घडलेली घटना आई-वडिलांना सांगितली. त्यांनी तिला धीर दिला. तथा शनिवारी सायंकाळी बडनेरा पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध विनयभंग, शिवीगाळ व पोक्सो अन्वये गुन्हा दाखल केला.