अमरावती : प्रेमसंबंध तोडल्यास मर्डर करण्याची धमकी देऊन प्रियकर आपला मोबाइल घेऊन पळवून गेल्याची तक्रार एका अल्पवयीन मुलीने गाडगेनगर पोलिसांत नोंदविली आहे. यापूर्वी देखील आपण त्याला दोनदा मोबाइल घेऊन दिले, रोकडदेखील दिली. मात्र, त्यानंतरही त्याचे मोबाइल वेड कमी झाले नसल्याचे पीडिताने म्हटले आहे. याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी २१ मे रोजी रात्री दहाच्या सुमारास आरोपी गौरव पवार (रा. देशमुख लॉनजवळ, अमरावती) याच्याविरुद्ध विनयभंग, खंडणी, मारहाण व पोस्कोचा गुन्हा दाखल केला.
तक्रारीनुसार, येथील एका अल्पवयीन महाविद्यालयीन विद्यार्थिनीची मैत्रिणींच्या माध्यमातून गौरव पवार याच्याशी ओळख झाली. मोबाइल क्रमांकाची देवाणघेवाण झाल्यानंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. ती देखील त्याच्यावर प्रेम करीत होती. एक दिवस कॉलेजमध्ये असताना त्याने तिच्याकडे स्वत:साठी मोबाइल घेऊन मागितला. अन्यथा मारण्याची धमकीदेखील दिली. तो तिच्याकडे पैसेदेखील मागत होता. सतत हेक्यामुळे तिने त्याला ६०० रुपये कॉलेजमध्ये नेऊन दिले. मात्र, त्यानंतर तो वारंवार तिच्याकडे पैसे मागू लागला. आई-वडिलांना सांगितल्यास घरी येऊन चाकूने जिवानिशी मारून टाकीन अशी धमकी त्याने दिली. त्यामुळे तिने त्याला दोन मोबाइल व ६०० रुपयेसुद्धा दिले.
१४ एप्रिलला मारहाण
१४ एप्रिल २०२३ रोजी पुन्हा मोबाइल व पैसे आणले काय, अशी विचारणा त्याने केली. नकार दिला असता त्याने तिला लाथाबुक्क्यांनी पाठीवर मारहाण केली. त्यामुळे मी तुझ्यावर प्रेम करीत नाही, मी तुझ्या त्रासाला कंटाळले, असे तिने बजावले. त्यावर, तू कशी काय माझ्याशी प्रेमसंबंध तोडतेस, मी पाहतोच. जर माझ्यावर प्रेम केले नाही तर मी तुला एखाद्या दिवशी जिवानिशी मारून टाकीन, अशी धमकी त्याने दिल्याचे पीडिताने म्हटले आहे.
मोबाइल घेऊन पळाला
२१ मे रोजी दुपारी दोनच्या सुमारास पीडिता ही दूध आणण्याकरिता चालत जात असताना गौरव पवार हा तिच्या पाठी आला. दुचाकी तिच्यासमोर आडवी करून तिचा विनयभंग केला. हात पिरंगळला. तुझ्या जवळचा मोबाइल दे, अशी धमकी तिला दिली. त्यामुळे तिने घाबरून स्वत:जवळचा मोबाइल त्याला दिला. मोबाइल दिल्यावर क्षणभरही न थांबता तो दुचाकीने निघून गेला. भेदरलेल्या स्थितीत तिने कुटुंबीयांकडे आपबिती कथन केली. त्यांनी तिला धीर देत सायंकाळी तिला घेऊन पोलिस ठाणे गाठले.