अमरावती : सिध्दार्थ रामटेके नामक व्यक्तीने अमरावतीच्या पंचवटी चौकात तथाकथित लवाद न्यायाधिकरण स्थापन करून ते समांतर न्यायालय चालवित असल्याचा धक्कादायक गौप्यस्फोट अमरावती वकील संघाने केला आहे. त्या तथाकथित लवादाला न्यायनिर्णय करण्याचा कोणताही हक्क नसताना पक्षकारांकडून पैसे उकळण्यात येत आहे. सोबतच बऱ्याचशा दिवाणी व फौजदारी प्रकरणामध्ये चुकीचे आदेश पारित करण्यात येत असल्याचे वकील संघाने म्हटले आहे. त्यावर त्या लवादाची संपूर्ण चौकशी करून कार्यवाही करण्याची विनंती अमरावती जिल्हा वकील संघाने जिल्हाधिकाऱ्यांकडे १३ ऑक्टोबर रोजी दिलेल्या तक्रारीतून केली आहे.
त्या तथाकथित लवादाचा अधिकारी म्हणून सिध्दार्थ रामटेके कामकाज करीत असून, कुठलाही कायदेशीर अधिकार नसताना त्यांच्या पंचवटीस्थित कार्यालयात नोटीस काढून लोकांना बोलावण्यात येते. ज्याला नोटीस दिली गेली, तो आल्यास त्याच्याकडून जबरदस्तीने तो त्या लवादात प्रकरण चालविण्यास इच्छुक असल्याचे लिहून घेण्यात येत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
१२ ऑक्टोबर रोजी येथील जिल्हा व सत्र न्यायाधीशांकडे सुनावणीसाठी आलेल्या एका जामीन अर्जावर सरकारी वकील म्हणून युक्तिवाद करत असलेल्या ॲड. सुनील देशमुख यांनी त्या लवादाबाबत आक्षेप घेतला होता. त्याचवेळी दुपारी ३.४५ च्या सुमारास सिध्दार्थ रामटेके यांनी सुनील देशमुख यांना फोन करून धमकी दिली होती. माझ्या लवादाबाबत तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही, तुम्ही आर्बिटेशन ॲक्ट वाचला आहे का, तुम्ही बोगस वकील आहात, असे सुनावले होते.
ॲड. देशमुख यांनी त्याबाबत तत्काळ जिल्हा व सत्र न्यायाधीशांकडे लेखी तक्रार दिली. त्यात न्यायाधीशांनी गाडगेनगर झोनच्या सहायक पोलीस आयुक्त पूनम पाटील यांना तीन दिवसांत लवादाची कार्यकक्षा व एकूणच चौकशी अहवाल दाखल करण्याचे निर्देश दिले. दरम्यान त्या लवाद प्राधिकरणाची सत्यता पडताळणी करण्याची मागणी आपण न्यायाधीशांकडे केली होती, असे ॲड. सुनील देशमुख यांनी सांगितले. याबाबत सिध्दार्थ रामटेके यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, होऊ शकला नाही.
पंचवटीस्थित ते लवाद न्यायाधिकरण दोन वर्षांपासून समांतर न्यायालय चालवत आहे, निवाडा करत आहे. त्यात अनेकांची आर्थिक पिळवणूकदेखील झाली आहे. सबब, त्या तथाकथित लवादाबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. त्यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे चौकशी सोपविली आहे.
ॲड. शोएब खान, अध्यक्ष, अमरावती जिल्हा वकील संघ
त्या लवाद न्यायाधिकरणाच्या अधिकार क्षेत्राबाबत चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाकडून प्राप्त झाले आहेत. त्याअनुषंगाने चौकशी सुरू केली असून, शनिवारी त्याबाबतचा अहवाल न्यायालयात दाखल करण्यात येईल.
पूनम पाटील, सहायक पोलीस आयुक्त, अमरावती