अमरावती: आत्मदहनासाठी आलेल्या दोघांपैकी एका पुरूष आंदोलकाने जिल्हाधिकारी कार्यालयातील स्वच्छतागृहात जाऊन स्वत:च्या हातावर ब्लेडने वार केले. ८ मार्च रोजी दुपारी १२.१० च्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ही खळबळजनक घटना घडली. याप्रकरणी त्या आंदोलकाविरूध्द गाडगेनगर पोलिसांनीो आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. पुंडलिक बगाडे (५६, रा. घुईखेड, ता. चांदूररेल्वे) असे गुन्हा दाखल झालेल्या आंदोलकाचे नाव आहे.
गाडगेनगर पोलीस ठाण्यात कार्यरत हेड कॉन्स्टेबल अजय कोठे हे ८ मार्च रोजी दुपारी महाशिवरात्री असल्याने खुपीया ड्युटीवर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात उपस्थित होते. दरम्यान आरोपी पुंडलिक बगाडे व नलूबाई बागडे या दोघांनी ८ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे आत्मदहनाचा इशारा दिला होता. सकाळी ११.३० वाजताच्या दरम्यान ते दोन्ही कार्यकर्ते त्यांना येतांना दिसले. त्याबाबत कोठे यांनी त्यांना विचारपुस केली. दरम्यान, कोठे यांची नजर चुकवून पुंडलिक बागडे हे तेथीलच बाथरुममध्ये शिरले. तेथे त्यांनी डाव्या हातावर ब्लेडने वार करुन, आत्महत्येचा प्रयत्न केला. ते कृत्य करुन बागडे हे प्रशासनास वेठीस धरण्याचा प्रयत्न करित असल्याची फिर्याद कोठे यांनी नोंदविली. याप्रकरणी, सायंकाळी ६.५२ च्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला.
काय आहे प्रकरण?
पुंडलिक बागडे व नलू बागडे हे दाम्पत्य बेंबळा प्रकल्पग्रस्त आहेत. त्यांनी यापुर्वी देखील आत्मदहनाचा इशारा दिला होता. आपल्या प्रकल्पबाधित घराचा मोबदला प्रकल्प अधिककाऱ्यांनी अन्य व्यक्तीला दिला, त्यात भ्रष्टाचार करण्यात आला. मात्र चौकशीची मागणी करून त्यातून काहीही हशील झाले नाही. सोबतच आपल्याला नझूलवरील दोन भूखंडाचा मोबदला देखील मिळाला नाही, त्यामुळे तो त्वरेने मिळावा, अशा त्यांच्या मागण्या आहेत.