अमरावती/ वरूड : वरूड येथे घरफोडी करून सोने व रोकड पळविणाऱ्या अट्टल चोरास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नागपुरातून अटक केली. त्याने त्या चोरीची कबुली दिली असून, त्याच्याकडून सुमारे ४० हजार ८७० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे निरिक्षक तपन कोल्हे यांच्या नेतृत्वातील पथकाने सोमवारी ही कारवाई करण्यात आली. धिरज सुनील शिरभाते (रा. पारडी बोरांग ता. वरुड) असे अटक आरोपीने नाव आहे.
वरूड शहरातील देशमुखवाडी येथील रहिवासी संजय भीमराव निमजे (५१) यांच्या घरातून ६ ग्रॅम सोन्याची अंगठी व ६००० रुपये रोकड असा एकूण ३६,००० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता. त्याबाबत वरूड पोलिसांनी ६ डिसेंबर २०२२ रोजी अज्ञाताविरूध्द गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना यातील आरोपी हा नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील मोहगाव झिल्पी येथे राहत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यावरून त्याला ताब्यात घेण्यात आले.
त्याने त्या गुन्हयाची कबुली दिली. त्याच्या ताब्यातून ६.३४० ग्रॅम सोन्याची अंगठी, ६ हजार रुपये रोख रक्कम असा एकूण ४० हजार ८७० रूपयांचा जप्त करून आरोपीला वरूड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
यांनी केली कार्यवाही
पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ, अप्पर पोलीस अधिक्षक शशीकांत सातव यांच्या मार्गदर्शनाखाली तथा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तपन कोल्हे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक नितीन चुलपार, सहायक फौजदार संतोष मुंदाने, हवालदार रविंद्र बावने, बळवंत दाभने, पंकज फाटे, दिनेश कनोजिया यांच्यासह वरूड येथील सहायक फौजदार राजु मडावी, सचिन भगत, विनोद पवार, चालक कमलेश पाचपोर यांनी केली.