अमरावती : शहरासह वरुड व यवतमाळातून दुचाकी चोरणाऱ्या तिघांना गाडगेनगर पोलिसांच्या डीबी स्कॉडने अटक केली. त्यांच्याकडून चोरीच्या ११ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. त्या त्रिकुटाच्या अटकेमुळे चोरी व घरफोडीचे एकुण १२ गुन्हे उघड झाले.
निखिल ताटे (रा. महेंद्र कॉलनी), नितिन खडसे (रा. छत्रसालनगर) व पिंटू कोरडे (रा. पुसला, वरूड) अशी अटक चोरांची नावे आहेत. दुचाकी चोरीच्या घटनांचा तपास करत असताना त्यात निखिल ताटे याचा हाथ असल्याचे समोर आले. त्यानुसार गाडगेनगर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आणखी चौघांची नावे पोलिसांना सांगितली. त्यानुसार त्यातील नितिन खडसे व पिंटू कोरडे यांना पोलिसांनी मध्यप्रदेश येथून ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी गाडगेनगर, कोतवाली व राजापेठ ठाण्याच्या हद्दीसह वरूड व यवतमाळ शहरातून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. त्यानुसार त्यांच्याकडून ११ दुचाकी जप्त करण्यात आल्यात. तीनही दुचाकी चोरट्यांनी चौकशी दरम्यान पोलिसांना घरफोडीच्या गुन्ह्यातील दोघांची नावे सांगितली. त्यानुसार पोलिसांनी इरफानोद्दीन कमरोद्दीन (रा. यास्मीननगर) व सय्यद इरफान सय्यद रसुल (रा. हाजरानगर) यांना अटक करून त्यांच्याकडून घरफोडीचा एक गुन्हा उघडकीस आणला.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेडडी, उपायुक्त सागर पाटील व एसीपी पुनम पाटील यांच्या नेतृत्वात गाडगेनगरचे ठाणेदार आसाराम चोरमले, सायबरच्या पोलीस निरीक्षक सीमा दाताळकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश इंगोले व रवींद्र सहारे, पोलीस उपनिरीक्षक पंकज ढोके, निळकंठ गवई, गणेश तंवर, गजानन बरडे, आस्तिक देशमुख, सचिन बोरकर, संग्राम भोजने, पंकज गाडे, राजेश देवीकर, अनुप झगडे, प्रकाश किल्लेकर, सुशांत प्रधान, सागर धरमकर, जयसेन वानखडे यांनी केली.