अमरावती: शुक्रवारला सायंकाळी पश्चिम आकाशात चंद्र-शुक्राची पिधान युती पहायला मिळाली. दुर्बिणीतून ही पिधान युती पाहण्याचा आनंद अनेकांनी घेतल्याचे मराठी विज्ञान परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
माहितीनुसार, दुपारी ०४:१५ वाजता पश्चिम आकाशात चंद्रकोरीच्या वरील बाजूकडून शुक्र ग्रहाने स्पर्श केला व तो चंद्राच्या पाठीमागे नाहीसा झाला. यावेळेस शुक्र पृथ्वीपासून १८ कोटी ५३ लाख ८१ हजार किलोमीटर अंतरावर व त्याची तेजस्विता - (उणे) ३.९८ होती. पृथ्वीचा उपग्रह चंद्र मात्र ३ लाख ७२ हजार ७०२ किलोमीटर अंतरावर असणार असून यावेळेस त्याची तेजस्विता - (उणे) ८.२९ जवळपास असल्याचे सांगण्यात आले.
जवळपास पंचावन्न मिनीटे चंद्रकोरी मागे लपलेला शुक्र ग्रह सायंकाळी सहाच्या सुमारास चंद्राच्या खालील बाजूकडून बाहेर पडताना दिसल्यानंतर या विलोभनीय पिधान युतीचा मोक्ष झाल्याचे मराठी विज्ञान परिषदेचे विभागीय अध्यक्ष प्रवीण गुल्हाने व हौसी खगोल अभ्यासक विजय गिरुळकर यांनी सांगितले.