अमरावती: नो पार्किंगमधून उचललेली मोपेड जागच्या जागेवरूनच सोडण्यासाठी एक महिला वाहतूक पोलिसांशी भिडली. तिने दहा पंधरा व्यक्तींनाही एकत्र केले. नो पार्किंग वाहनात असलेली दुचाकी काढण्याचा प्रयत्न केला. अखेर पोलिसांना तिच्यासह १५ पुरूषांविरूध्द शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करावा लागला. १६ मार्च रोजी कोर्ट चौकात हा हायव्होल्टेज ड्रामा रंगला.
याबाबत शहर वाहतूक शाखेचे अंमलदार प्रदीप कावरे यांच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी १८ मार्च रोजी रात्री ११ वाजता गुन्ह्याची नोंद केली. कोर्ट चौकात वाहनांची गर्दी झाल्याची माहिती वायरलेसवरून मिळताच प्रदीप कावरे हे गुरूवारी दुपारी १ च्या सुमारास कोर्ट चौकात पोहोचले. त्यावेळी एक महिला त्यांच्याकडे धावत आली. माझी पांढरी मोपेड मला परत द्या, असे त्या महिलेने म्हटले. त्यावर वाहतूक कार्यालयात येऊन नियमाप्रमाणे दंड भरून तुमची दुचाकी घेऊन जा, असे कावर यांनी सांगितले. मात्र ऐकण्याच्या मनस्थितीत नसलेल्या त्या महिलेने आरडाओरड करत १० ते १५ लोकांना आवाज देऊन बोलावले.
दबावतंत्राचा वापर
त्या महिलेने वाहतूक पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. त्या अनोळखी व्यक्तींपैकी दोन लोक नो पार्किंग वाहनात शिरले. तथा आतील दुचाकी काढण्याचा प्रयत्न केला. त्यातील एकाने वाहतूक अंमलदार कावरे यांना धक्काबुक्की देखील केली. त्यामुळे तेथे चांगलाच तणाव निर्माण झाला होता. अखेर त्या महिला पुरूषांविरूध्द गुन्हा दाखल करण्याचे निर्देश एसीपींनी दिले.