पंकज लायदे
धारणी (अमरावती) : मेळघाटातील दुणी गावातील रहिवासी एका गर्भवतीच्या प्रसूतीनंतर सर्व जण अवाक् झाले. सोनोग्राफीच्या अहवालानुसार जुळे होण्याचा अंदाज असताना या महिलेने चार मुलींना जन्म दिला. प्रसूता व चारही नवजात सुखरूप आहेत.
धारणी तालुक्यातील दुणी येथील रहिवासी बलवंत उईके व पत्नी पपिता (२४) यांना आधी दोन वर्षांचा मुलगा आहे. बलवंत हा गवंडीकाम करतो. त्यासाठी हे कुटुंब फिरस्तीवर असते. पपिता दुसऱ्यांदा गर्भवती झाली त्यावेळी तिने कळमखार प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत दुणी गावातीलच आरोग्य उपकेंद्रात नोंद करून घेतली. अधिपरिचारिका एस.बी. अढागळे आणि आशा वर्कर वनमाला गिरी यांच्यामार्फत ती महिनाभराच्या औषधी घेऊन पतीसमवेत वरूड तालुक्यात गवंडी कामाकरिता निघून जात होती. पाचव्या महिन्यात वरूड येथे खासगी इस्पितळात तिने सोनोग्राफी केली. त्यावेळी जुळे होणार असल्याचा अहवाल देण्यात आला. दुणी येथे वैद्यकीय अधिकारी किशोर राजपूत यांच्याकडूनही तिने तपासणी करून घेतली. तिला सोनोग्राफीला धारणी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. तेथेही जुळ्यावर शिक्कामोर्तब झाले. त्यामुळे आरोग्य विभागाने तिच्याकडे विशेष लक्ष पुरविले.
पपिताला मंगळवारी सकाळी धारणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी प्रीती शेंद्रे, अधिपरिचारिका अढागळे, आशा वर्कर वनमाला गिरी, अधिपरिचारिका गोरे यांनी तिची बुधवारी नॉर्मल प्रसूती केली. तिने चार गोंडस मुलींना जन्म दिला. जोखमीची प्रसूती सुखरूप पार पडल्याने ही बाब कौतुकाची ठरली आहे. चारही मुलींना एसएनसीयू विभागात ठेवण्यात आले, तर माता उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहे.
सोनोग्राफीबाबत आश्चर्य
पपिता उईके हिची गर्भावस्थेच्या पाचव्या महिन्यात वरूड येथे, तर आठव्या महिन्यात धारणी उपजिल्हा रुग्णालयात सोनोग्राफी करण्यात आली. दोन्ही ठिकाणी जुळे होणार असल्याचेच स्पष्ट करण्यात आले. यामुळे सोनोग्राफी अहवालात तिला चार मुले असल्याचे का स्पष्ट झाले नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.
जन्माला आलेली बाळे ही कमी दिवसाची व कमी वजनाची आहेत. त्या बाळांचे वजन दीड किलोच्या आत आहे. त्यांची व मातेची प्रकृती सध्या ठीक आहे. अतिदक्षता कक्षात त्यांची काळजी घेतली जात आहे.
- दयाराम जावरकर, बालरोगतज्ज्ञ तथा वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, धारणी