अमरावती : ॲडव्हान्स स्टेजमधील स्तन कर्करोग असलेल्या एका ४५ वर्षीय महिलेची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यास डॉक्टरांना यश आले आहे. स्थानिक विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय (सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल) येथे ही शस्त्रक्रिया करण्यात आली. दोन तास चाललेल्या या शस्त्रक्रियेत डॉक्टरांनी तब्बल साडेचार किलो कर्करोगाची गाठ काढली आहे. या शस्त्रक्रियेनंतर महिलेच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे सर्वच प्रकारच्या कर्करोगाच्या शस्त्रक्रिया होत असून, येथे अमरावती विभागाबरोबरच काही मध्य प्रदेशातील रुग्णही उपचारासाठी दाखल होतात. अचलपूर तालुक्यातील ४५ वर्षीय महिला ही उजव्या बाजूच्या स्तनाच्या अचानक वाढत्या आकारामुळे येथे भरती झाली होती. यावेळी डॉक्टरांनी तपासणी केली असता, या महिलेला स्तनाचा ॲडव्हान्स कर्करोगाची ही गाठ असल्याचे लक्षात आले. या गाठीमध्ये कोणत्याही प्रकारचा त्रास नसल्याने या महिलेने त्याकडे केलेल्या दुर्लक्षामुळे ही गाठ मोठ्या प्रमाणावर वाढली होती. या गाठीचा आकार हा २० बाय २० सेंटीमीटर इतका वाढला होता. त्यामुळे डॉक्टरांनी तातडीने या महिलेवर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.अमोल नरोटे व विशेष कार्यअधिकारी डॉ.मंगेश मेंढे यांच्या मार्गदर्शनामध्ये कर्करोग तज्ज्ञ डॉ.मनीष तरडेजा, डॉ.रोहित मुंदडा, डॉ.अमित बागडिया, बधिरीकरण तज्ज्ञ डॉ.सचिन गोंडाणे यांनी ही शस्त्रक्रिया यशस्वी केली. यावेळी डॉक्टरांनी जवळपास साडेचार किलो वजनाच्या या गाठीतून या महिलेला मुक्त केले. शस्त्रक्रियेनंतर महिलेच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. या शस्त्रक्रियेमध्ये परिचारिका बिल्कीस शेख, एल.पांडे, अपेक्षा वाघमारे, जया वाघमारे, कोमल खाडे यांनीही सहकार्य केले. ही शस्त्रक्रिया महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत मोफत करण्यात आली आहे.
"महिलेला स्तनाच्या गाठीचा कोणत्याही प्रकारचा त्रास नसल्याने तिने सुरुवातीला त्याकडे दुर्लक्ष केले, परंतु या गाठीचा आकार हा झपाट्याने वाढत होता. आरोग्य भाषेत या महिलेला ॲडव्हान्स स्टेजमधील स्तन कर्करोग झाला होता. त्यामुळे शस्त्रक्रिया करून २० बाय २० एवढी मोठी स्तनाची गाठ काढून टाकली. महिलेच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे."- डॉ.मनीष तरडेजा, कर्करोग सर्जन.