लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : नजीकच्या मोथा येथील आरोग्य उपकेंद्रात दहा तासांच्या ओल्या बाळंतिणीला बाहेर काढून पायीच घरी जाऊ दिल्याचा धक्कादायक प्रकार तीन दिवसांपूर्वी घडला. यासंदर्भात माजी उपसरपंच जगत शनवारे यांनी आ. राजकुमार पटेल व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे तक्रार करून संबंधिताविरुद्ध कारवाईची मागणी केली. पहिल्यांदा नव्हे तर तिसऱ्यांदा संबंधित सेविकेने आदिवासी महिलांना हाकलून दिल्याचे पुढे आले आहे.
तालुक्यातील सलोना प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येत असलेल्या मोथा उपकेंद्रात हा प्रकार घडला. गावातील कविता ज्ञानेश्वर बेलसरे (२२, रा. वस्तापूर) असे आदिवासी प्रसूताचे नाव आहे. प्रसूतीच्या दुसऱ्या खेपेसाठी ती माहेरी मोथा येथे आली होती. कविता बेलसरे हिला रविवारी सायंकाळी ६ वाजता प्रसूतीकळा येत असल्याने आरोग्य उपकेंद्रात दाखल करण्यात आले. तेथे तिची प्रसूती झाली. सोमवारी सकाळी ९ वाजता संबंधित आरोग्य सेविकेने तुमच्याकडे गाडी आहे की टू व्हीलर, अशी विचारणा केली. मला बाहेर जायचे आहे, असे म्हणत तिला केंद्राबाहेर काढले. हा वृत्तांत बेलसरे कुटुंबाने जगत शनवारे यांना सांगितला. त्यांनी आ. राजकुमार पटेल तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे फिर्याद देत तत्काळ कारवाईची मागणी केली.
तिसऱ्यांदा घडला प्रकारसंबंधित आरोग्य सेविकेने सदर प्रकार पहिल्यांदा नव्हे, तर तिसऱ्यांदा ओल्या बाळंतिणीला केंद्रातून हाकलून दिल्याचा आरोप जगत शनवारे यांनी अधिकाऱ्यांना केलेल्या तक्रारीत केला आहे. नियमानुसार दोन दिवस आरोग्य केंद्रात देखरेखीत ठेवले आहे. त्यामुळे ही अपमानजनक वागणूक आहे. तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तक्रार करूनही कुठलीच दखल घेतली नाही. त्याउलट संबंधित आरोग्य सेविकेने परत बेलसरे कुटुंबाला गाठले आणि तक्रार केल्याबद्दल अर्वाच्य भाषा वापरल्याचे शनवारे यांनी तक्रारीत नमूद केले. वैद्यकीय अधिकाऱ्यावरही कारवाईची मागणी त्यांनी केली.
"संबंधित प्रकरणाची तक्रार प्राप्त झाली असून आपण स्वतः चौकशी करीत आहोत. प्रथमदर्शी महिला पायदळ घरी गेल्याची बाब उघडकीस आली आहे."- डॉ. चंदन पिंपळकर, प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकारी, चिखलदरा