अमरावती : दुचाकीने पाठीमागून येऊन चेन हिसकावल्याच्या घटना नवीन नाहीत. चेहरा ओळखू येऊ नये म्हणून हेल्मेटधारकांनी पादचारी महिलेचे लुटलेले सोने, या घटनादेखील घडत असतात. मात्र एका महिलेच्या घरात शिरून चक्क तिच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावण्यात आल्याची घटना गाडगेनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. २२ फेब्रुवारी रोजी दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली.
गाडगेनगर पोलिसांनी संबंधित महिलेच्या तक्रारीवरून चेहऱ्याला पांढरा दुपट्टा गुंडाळलेल्या एका मुलाविरुद्ध वाटमारीचा गुन्हा दाखल केला. तक्रारीनुसार, सून व मोठी नात शाळेत गेली असताना संबंधित महिला तिच्या दोन वर्षांच्या नातीसह घरी होत्या. दुपारी तीनच्या सुमारास तोंडाला पांढरा दुपट्टा बांधलेला एक मुलगा अचानक त्यांच्या घरातील किचनमध्ये शिरला. त्याला तू बुटासह अचानक घरात कसा काय आला, अशी विचारणा करताच त्याने त्या महिलेला कुठलेही प्रत्युत्तर न देता धक्का मारून ढकलून खाली पाडले. व त्यांच्या गळ्यातील १० ग्रॅमची सोन्याची मणी पोत जबरीने हिसकावली. पोत हाती येताच त्याने धूम ठोकली.
आरडाओरड व्यर्थ
अकस्मात घडलेल्या त्या घटनेतून क्षणात सावरत महिलेने आरडाओरड केली. महिलेने घराबाहेर निघून त्याचा पाठलागदेखील केला. मात्र तो त्याच्याकडील दुचाकीने हनुमान मंदिराकडे पळून गेला. त्याने हिसकावलेली ती पोत सुमारे २० हजार रुपये किमतीची असून, त्या भामट्याने पांढरा चौकडीचा शर्ट, काळी पॅन्ट असा पेहराव केल्याचे महिलेने तक्रारीत नमूद केले. घटनेची माहिती मिळताच गाडगेनगरचे ठाणेदार आसाराम चोरमले यांनी घटनास्थळी भेट दिली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज घेण्यात आले.