अमरावती : कतारहून नागपूर विमानतळावर दाखल झालेला युवक नियमित तपासणीत कोरोना पॉझिटिव्ह आढळला. त्याच क्षणी त्याच्या मोबाइलचे सिम कार्ड बदलल्याने त्याच्याशी संपर्क खंडित झाला. त्यामुळे प्रशासनाकडून त्याची शोधाशोध सुरू झाली. तो पळाल्याची हूल उठली असतानाच युवकाच्या वडिलांनी स्वत: प्रशासनाशी संपर्क साधून त्याला क्वारंटाईन केल्याचे सांगितले.
धामणगाव रेल्वे येथील २८ वर्षीय युवक सोमवारी कतारहून नागपूर विमानतळावर आला. येथे त्याची कोरोना चाचणी घेण्यात आली. चाचणी येईपर्यंत त्याला थांबविणे आवश्यक असताना त्याला घरी जाण्याची परवानगी देण्यात आली. या युवकाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर मात्र त्याचा शोध घेण्यात आला. यादरम्यान त्याच्याकडे असलेले कतारचे सिम बंद पडले. त्यामुळे त्याने ते बदलविले. त्यामुळे प्रशासनाचा त्याच्याशी संपर्क खंडित झाला. यादरम्यान त्याने पलायन केल्याचीही हूल उठली. हा युवक मिळत नसल्याने नागपूर, अमरावती जिल्हा प्रशासनाची धावपळ सुरू झाली.
अमरावती जिल्हा आरोग्य विभागाने धामणगाव तालुका आरोग्य विभागाशी संपर्क साधला. संबंधित युवकाच्या पित्याने जागरूकता दाखवत आपला मुलगा कतारहून घरी परतल्याची माहिती स्वतः धामणगाव रेल्वे तालुका आरोग्य विभागाला दिली. तहसीलदार वैशाख वाहूरवाघ यांनी ही बाब जिल्हा प्रशासनाला कळविली. यानंतर कुटुंबाने त्याला आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार क्वारंटाईन करून घेतले.
कतारवरून धामणगाव तालुक्यात आलेल्या युवकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या रुग्णाचा शोध लागला असून, त्याला क्वारंटाईन करून घेतले आहे. तसेच या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या हायरिस्क रुग्णांचेही नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. संबंधित रुग्ण व संपर्कात आलेल्या व्यक्तींवर आरोग्य विभागाची नजर आहे.
डॉ. दिलीप रणमले, जिल्हा आरोग्य अधिकारी