लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : शेत गुरे चराईसाठी दिले, त्याचे सातशे रुपये दिले नसल्याच्या वादातून दारूच्या नशेत कुऱ्हाडीने डोक्यासह तोंडावर सपासप वार करून गुरे चारणाऱ्याची हत्या करण्यात आल्याची घटना तालुक्यातील जामली आर गावात सकाळी ११ वाजता घडली. या घटनेने पंचक्रोशीत एकच खळबळ उडाली आहे.पोलीस सूत्रांनुसार, ईश्वर रमेश चव्हाण (३२, रा. जामली आर) असे मृताचे नाव आहे. हत्येप्रकरणी आरोपी हिरालाल रामा जामूनकर (५९, रा. जामली आर) याच्यासह पत्नी सोमती हिरालाल जामूनकर (४७) व मुलगा संजूलाल हिरालाल जामूनकर (३०) यांना चिखलदरा पोलिसांनी ताब्यात घेतले. ईश्वरचा मृतदेह हिरालालच्या घरी खाटेवर रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. ईश्वर चव्हाण हा गवळी समाजाचा असून, त्याचा दूध व पशुपालनाचा व्यवसाय आहे. आरोपी हिरालाल जामूनकर याचे शेत त्याने पाळीव गुरांच्या चराईसाठी सातशे रुपयांत घेतले होते. ही रक्कम मागितल्यावरसुद्धा दिली नसल्याने दोघांमध्ये वाद झाला. शुक्रवारी सकाळी ११ वाजता दोघे दारूच्या नशेत असताना आरोपी हिरालालने कुऱ्हाडीने वार करून ईश्वरची हत्या केली. घटनेची माहिती मिळताच चिखलदरा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शहाजी रूपनर, उपनिरीक्षक दिनेश तायडे, जमादार विनोद इसळ, प्रभाकर चव्हाण, अर्जुन केंद्रे, श्रीकांत खानंदे, आनंद देवकते, आशिष वरघड, संदीप देवकते आदींच्या चमूने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व आरोपींना अटक केली.
परिजनांचा आक्रोश, दोन मुले पित्याला मुकलीहत्या झाल्याचे कळताच घटनास्थळी गावातील व परिसरातील नागरिकांनीही एकच गर्दी केली होती. परिजनांचा आक्रोश होता. मृतक ईश्वर चव्हाण याला आठ व दहा वर्षाची दोन मुले आहेत.
सोयाबीन विकून आला ईश्वरईश्वर चव्हाण हा गुरुवारी अचलपूर बाजार समितीत सोयाबीन विकून आला होता. त्याचे पैसे त्याच्याजवळ होते. यामुळे वाद पैशांवरून की अन्य काही कारण, यासंदर्भात पोलीस तपास करीत आहेत.
कुऱ्हाडीने घाव घालून हत्या करण्यात आली आहे. घटनास्थळी माझ्या देखरेखीत पंचनामा करण्यात आला. हत्येच्या कारणांचा शोध सुरू असून, आरोपीला ताब्यात घेतले आहे. त्याची चौकशी सुरू आहे.- शहाजी रूपनर, सहायक पोलीस निरीक्षक, चिखलदरा