१० वर्षांपासून दुर्लक्ष : उपजिल्हा रूग्णालयाचा दर्जा देण्याची मागणीअंजनगाव सुर्जी : साठ हजाराच्या आसपास शहरातील व आसपासच्या ग्रामीण भागातील ६० ते ७० हजार अशा एकूण एक ते सव्वा लाख लोकसंख्येच्या अंजनगावातील ग्रामीण रूग्णालयाची मागील १० वर्षांपासून पार दुरवस्था झाली आहे. सन २००७-०८ पासून अंजनगावच्या ग्रामीण रूग्णालयाला उपजिल्हा रूग्णालयाचा दर्जा मिळावा, यासाठी चर्चा सुरू आहेत. मात्र, अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही. मात्र, या रूग्णालयासाठी मागील दोन वर्षांपासून सामाजिक कार्यकर्त्यांनी सुरू केलेला संघर्ष आता शिगेला पोहोचला आहे. याच श्रुंखलेंतर्गत सोमवारी सर्वपक्षिय मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रामीण रूग्णालयाला उपजिल्हा रूग्णालयाचा दर्जा मिळावा, यासाठी सामाजिक कार्यकर्ते अशोक मोरे यांनी बेमुदत उपोषण काही वर्षांपूर्वी सुरू केले होते. त्यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक अरूण राऊत, आ. रमेश बुंदिले यांनी वर्षभरात या ग्रामीण रूग्णालयाला उपजिल्हा रूग्णालयाचा दर्जा मिळवून देण्याचे व सर्व आवश्यक सुविधा पुरविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, या गोष्टीला एक वर्ष उलटूनही अद्याप आश्वासनाची पूर्तता करण्यात आलेली नाही. त्यामुळे हा सर्वपक्षिय मोर्चा काढण्यात आला. ग्रामीण रूग्णालयात सोनोग्राफी मशिनची सुविधा, कर्मचारी-डॉक्टरांची नियुक्ती, कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी, केशरी कार्डवर मोफत उपचार, औषधींचा पुरवठा, सीसीटीव्ही कॅमेरे आदी सोयी तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी निवेदनातून डॉक्टर सोळंके यांच्याकडे करण्यात आली. अन्यथा १ आॅक्टोबरपासून बेमुदत उपोषणाचा इशारा देखील देण्यात आला. याप्रसंगी राजेंद्र कोकाटे, अशोक मोरे, भाजप शहराध्यक्ष मनोहर मुरकुटे, महेश खारोळे, संजय रोहणकर, राजेंद्र पारिसे, अर्चना पखान, देवीदास वाळके, शिवदास मते, नंदकिशोर पाटोळे, कदीरभाई, मनोज मेळे, उमेश इंगळे, दिलीप सरदार, राजकुमार नितळकर आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)जागा उपलब्ध होताच नवी इमारतअंजनगाव ग्रामीण रूग्णालयाला उपजिल्हा रूग्णालयाचा दर्जा मिळावा, यासाठी मागील दोन वर्षापासून मी प्रयत्नरत आहे. ग्रामीण रूग्णालय परिसरातील जागा भूमी पर्यवेक्षकांनी नामंजूर केल्याने नवीन इमारतीसाठी पालिका हद्दीतील आठवडी बाजार परिसरातील जागेची मागणी केली आहे. जागा उपलब्ध होताच तातडीने रूग्णालयाच्या कामाला सुरूवात करू, असे आश्वासन आ. रमेश बुंदिले यांनी दिले.
अंजनगाव ग्रामीण रूग्णालयासाठी सर्वपक्षीय मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2016 12:19 AM