लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : स्थानिक आठवडी बाजारातून अचलपूरच्या एका अट्टल गुन्हेगाराचे अपहरण झाले आहे. जवळपास तीस दिवसांपूर्वी हे अपहरण दोन अपहरणकर्त्यांनी केले. अपहरणकर्ते सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. ज्याचे अपहरण केले गेले, त्याचा शोध अचलपूर व परतवाडा पोलीस घेत आहेत. प्रकरण अतिसंवेदनशील बनले असून, गंभीर वळणावर पोहोचले आहे. आपण केलेला गुन्हा उघड झाल्याचे बघून दोन अपहरणकर्त्यांपैकी एकाने दगड गिळून, तर दुसऱ्याने हातातील हातकडीने आपल्या कपाळावर मारून घेत स्वत:ला संपविण्याचा प्रयत्न केला. स्वत:चे कपाळ फोडून घेणाऱ्या आरोपीवर शासकीय दवाखान्यात उपचार सुरू आहेत. ज्याचे अपहरण झाले तो आणि अपहरणकर्ते असे तिघेही अचलपूरचेच आहेत. अपहरणाच्या घटनेच्या अनुषंगाने पोलिसांकडे तक्रार दाखल आहे. पोलिसांनी भादंविचे ३६४ अन्वये गुन्हा नोंदविला. यातील एका आरोपीला यापूर्वीच स्थानिक गुन्हे शाखेने, तर दुसऱ्या आरोपीस अचलपूर पोलिसांनी दरोडा, लुटमारीच्या घटनेत अटक करून परतवाडा पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.अपहरणापूर्वी दरोडाअपहरण करण्यापूर्वी या दोन्ही आरोपींनी परतवाडा-बैतुल रोडवरील द्वारका बार व रेस्टॉरन्ट येथे ३ डिसेंबरला मॅनेजरसोबत बिलावरून वाद घातला. चाकूने व्यवस्थापकाच्या मानेवर वार करून लुटमार, मारहाण करीत काऊंटरमधून सहा हजार रुपये जबरीने चोरून नेले होते. त्यांच्याविरुद्ध परतवाडा पोलिसांनी भादंविचे कलम ३९४ व ३४ अन्वये गुन्हा दाखल केला होता. गुन्हे शाखा पथकाने ७ डिसेंबरला सचिन भामोरे (२३, रा. चावलमंडी, अचलपूर) याला अटक करून परतवाडा पोलिसांच्या स्वाधीन केले. त्याचा फरार साथीदार सागर सोनोने (३०) यास देवडी परिसरातून २७ डिसेंबरला अचलपूर पोलिसांनी अटक करुन परतवाडा पोलिसांच्या स्वाधीन केले. अपहरणकर्त्यांवर गंभीर गुन्हेअपहरणकर्ते आणि ज्याचे अपहरण झाले, त्यांच्यावर यापूर्वी अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. सागर सोनोने (रा. माळवेशपूरा, अचलपूर) याच्याविरुद्ध अकोला व अमरावती जिल्ह्यात खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, अपहरण व चोरी प्रकरणात गुन्हे दाखल आहेत. परतवाड्याच्या आठवडी बाजारातून अचलपूरच्या अट्टल गुन्हेगाराचे अपहरण करण्यामागचा उद्देश आणि ज्याचे अपहरण केले, तो कुठे आणि कुठल्या स्थितीत आहे, याविषयीची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.
परतवाड्यात बाजारातून अट्टल गुन्हेगाराचे अपहरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2021 5:00 AM
आपण केलेला गुन्हा उघड झाल्याचे बघून दोन अपहरणकर्त्यांपैकी एकाने दगड गिळून, तर दुसऱ्याने हातातील हातकडीने आपल्या कपाळावर मारून घेत स्वत:ला संपविण्याचा प्रयत्न केला. स्वत:चे कपाळ फोडून घेणाऱ्या आरोपीवर शासकीय दवाखान्यात उपचार सुरू आहेत. ज्याचे अपहरण झाले तो आणि अपहरणकर्ते असे तिघेही अचलपूरचेच आहेत.
ठळक मुद्देअपहरणकर्ते सीसीटीव्हीत कैद, अपहरण झालेल्याच्या शोधात पोलीस