अमरावती : चांदूर रेल्वे येथे २१ सप्टेंबर रोजी एका मुलीचे अपहरण करण्यात आले होते. त्यामुळे चांदूर रेल्वे शहर हादरून गेले होते. पोलीस यंत्रणा चौकशीसाठी दिवस-रात्र कामाला लागली होती. मात्र, २२ सप्टेंबर मध्यरात्री अपहरण केलेल्या शेख नईम यांनी मुलीला तिच्या घरी सोडून दिले. तथापि त्यानंतर परिसरात अज्ञातांकडून शेख नवीन यांचा खून करण्यात आला, अशी धक्कादायक घटना मध्यरात्री चांदूर रेल्वे येथे घडली.
नेमकं काय घडलं?
चाकूच्या धाकावर घरातून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण बुधवारी झाले होते. या प्रकरणातील आरोपींच्या शोधात पोलीस पथके रवाना करण्यात आली तरी त्यांना अटक झाली नाही. त्याच्या निषेधार्थ व आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी चांदूर रेल्वे पोलीस ठाण्यापुढे गुरुवारी सकाळपासून हजारोंच्या जमावाने ठिय्या दिला. पोलिसांनी एका आरोपीला अटक केली.
बुधवारी दुपारी ३.३० च्या सुमारास अपहरणाची घटना घडली होती. आरोपी नईम खान, शेख अशफाक, अतुल कुसराम व चांदूरवाडी येथील एका जणाने कुटुंबातील सदस्यांसमोरच चाकूचा धाक दाखवीत मुलीला जबरदस्तीने ओढून वाहनात कोंबले व पलायन केले. पीडित व आरोपीच्या शोधार्थ ठाणेदार विलास कुलकर्णी यांच्या नेतृत्वात पथक रवाना झाले होते. अपहृत मुलीच्या कुटुंबीयांसह गारुडीपुऱ्यातील आबालवृद्धांनी गुरुवारी सकाळपासून पोलीस ठाण्यापुढे आरोपींना अटक करा, अशी मागणी करीत ठिय्या दिला. नारेबाजी करण्यात आली. यामुळे आरसीपीचा ताफा मागविण्यात आला.
दरम्यान, अपहरण करणाऱ्या चौघांपैकी अतुल कुसराम याला अटक करण्यात आली. पोलीस अधिकाऱ्यांनी गारुडीपुऱ्यातील महिला व पुरुषांना याबाबत माहिती दिली व आरोपींना लवकरात लवकर अटक करू, असे आश्वासन दिले. यानंतर नागरिकांना रवाना करण्यात आले. पोलीस यंत्रणा चौकशीसाठी दिवस-रात्र कामाला लागली होती. मात्र, २२ सप्टेंबर मध्यरात्री अपहरण केलेल्या शेख नईम यांनी मुलीला तिच्या घरी सोडून दिले. त्यानंतर परिसरात अज्ञातांकडून शेख नवीन याची हत्या करण्यात आली. या घटनेने एकच खळबळ उडली आहे.