लोकमत न्यूज नेटवर्क दर्यापूर : दर्यापूर मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार कॅप्टन अभिजित अडसूळ यांनी गुरुवारी शिंदेसेनेतून नामांकन अर्ज दाखल केला. माहेश्वरी भवन प्रचार कार्यालयापासून ते नवीन तहसीलपर्यंत पायदळ रॅलीने वातावरण भगवेमय झाले होते. अडसुळांच्या शक्तिप्रदर्शनाची दर्यापुरात चर्चा होती. दरम्यान, निवडणूक निर्णय अधिकारी राजेश्वर हांडे यांच्याकडे दोन अर्ज सादर करण्यात आले.
नामांकनापूर्वी अगोदर जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करून बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. नामांकन दाखल करते वेळी अभिजित अडसूळ यांच्या सोबत यावेळी माजी केंद्रीय मंत्री आनंदराव अडसूळ, माजी शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे, गजानन वाकोडे, रवींद्र गणोरकर, जिल्हाप्रमुख गोपाल अरबट उपस्थित होते. नामांकनापूर्वी तहसीलबाहेर आनंदराव अडसूळ यांनी मार्गदर्शन केले. दर्यापूरच्या जागेसाठी भाजप- शिंदेसेनेत मोठी चढाओढ झाली असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासाठी आग्रह धरला नि दर्यापूर मतदारसंघ शिंदेसेनेला सोडण्यात आला, हे विशेष.