अमरावती : एप्रिलपासून कोरोनाचा उद्रेक वाढला आहे. दुसरी लाट आल्याचे चित्र आहे. मात्र, दररोज आढळून येणाऱ्या कोरोना संक्रमित रुग्णसंख्येचा आलेख बघितला, तर ७० टक्के रुग्ण ऑरेंज बेल्टमधील असल्याचे दिसून येते. यात वरूड, अचलपूर, माेर्शी, तिवसा, अंजनगाव सुर्जी हे कोविडचे ‘हॉट स्पॉट’ ठरत असल्याची माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी शुक्रवारी येथे दिली.
जिल्ह्यात ९ ते १५ मे रोजीपर्यंत लागू केलेल्या संचारबंदी आदेशात काही बदल करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी नवाल यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. येत्या काळात खरीप हंगामाला सुरुवात होणार आहे. मात्र, कोरोनाची स्थिती फार सुधारलेली नाही. संक्रमित रुग्ण आणि मृत्युसंख्या वाढतच असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. कोरोनाची दररोज हाती येणारी आकडेवारी ग्रामीण भागात संक्रमणाचा सर्वाधिक वेग असल्याचे वास्तव स्पष्ट करते. त्यामुळे बी-बियाणे हे गावातच पोहचविण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. फ्री बुकिंग केल्यानंतर शेतकऱ्यांना बांधावर खते, बी-बियाणे देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांनी शहरात येऊ नये, त्यांच्या मागणीनुसार गावातच शेतीपयोगी, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात येणार आहे. परंतु, ऑरेंज बेल्टमध्ये कोरोनाचे मृत्यू, रुग्णसंख्या आढळून येत असल्याने ते धोकादायक ठरणारी असल्याचे जिल्हाधिकारी नवाल म्हणाले. यावेळी महापालिका आयुक्त प्रशांत रोडे उपस्थित होते.
------------------
ऑरेंज बेल्टमध्ये कोरोनाची आकडेवारी
अचलपूर- ५७१७
वरूड-६३१९
चांदूर बाजार-२३५९
अंजनगाव सुर्जी-२५४१
मोर्शी- ३४१२
तिवसा- २८६०
-------------------
पीककर्जासाठी गावातच शिबिर
कोरोना संसर्गाची स्थिती भयावह असल्याने शेतकऱ्यांना गावातच खरीप पीक कर्ज उपलब्ध होण्यासाठी बँकेचे शिबिर आयोजित केले जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली. गावातच पीककर्ज उपलब्ध झाल्यास ते शेतकऱ्यांसाठी योग्य राहील, असे ते म्हणाले.