अमरावती : शतकोत्तर वाटचाल करणाऱ्या अमरावती येथील श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचा रशियन ऑलिंपिक विद्यापीठासोबत १६ मे रोजी शैक्षणिक क्रीडा करार होणार आहे. खासगी क्रीडा अभिमत विद्यापीठाचा दर्जा प्राप्त हव्याप्र मंडळासोबत होणारा करार हा देशातील पहिला सर्वेाच्च बहुमान असल्याची माहिती पत्रपरिषदेतून मंडळाचे आंतरराष्ट्रीय समन्वयक प्रा. प्रणव चेंडके यांनी दिली.
भारतीय पारंपारीक खेळांचा देशासह जागतिक स्तरावर प्रचार, प्रसार व प्रशिक्षणात्मक संशाेधन करणारे श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ आजमितीला आतंरराष्ट्रीयस्तरावर युनेस्काे सदस्य म्हणून क्रीडा क्षेत्रात यशस्वी कार्य करीत आहे. आता या क्रीडा कार्याला सर्वाेच्च बहुमान मिळाला असून जगातील नामांकीत रशियन इंटरनॅशनल ऑलिंपिक विद्यापीठाचा शैक्षणिक क्रीडा करार श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाशी पाच वर्षांकरिता ऑनलाईन होणार आहे. थेट इंटरनॅशनल ऑलिंपिक विद्यापीठाशी हाेत असलेला हा खासगी करार देशातील पहिला असून याद्वारे दाेन्ही देशातील क्रीडा, शिक्षण व प्रशिक्षणाला नवीन काैशल्य लाभणार आहे. भारतीय खेळाडू व विद्यार्थ्यांकरीता ही संधी उज्वल भवितव्य साकारणारे असल्याचे प्रा. प्रणव चेंडके यांनी सांगितले.
दरवर्षी एका विद्यार्थ्याला रशियन विद्यापीठ स्कॉलरशीप प्रदान करणार असून, त्याची निवड समितीद्वारे केली जाणार आहे. यावेळी पत्रपरिषदेला मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य, उपाध्यक्ष डाॅ. श्रीकांत चेंडके, सचिव डाॅ. माधुरी चेंडके, डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशनचे प्राचार्य डाॅ. श्रीनिवास देशपांडे आदी उपस्थित हाेते.ब्लादमीर पुतीन आहेत अध्यक्ष
आज जागतिकस्तरावर ऑलिंपिक स्पर्धा विविध खेळासाठी प्रतिष्ठित मानल्या जाते. या ऑलिंपिक स्पर्धांमधील यशस्वी खेळाडूंना जागतिक स्तरावरील किर्ती प्राप्त होत असते. जगातील बहुतांश यशस्वी खेळाडू हे ऑलिंपिक विद्यापीठातून प्रशिक्षीत झालेले असतात. जगामध्ये केवळ तीन ऑलिंपिक विद्यापीठ असून रशियाच्या सोची येथील इंटरनॅशनल ऑलम्पिक ऑलिंपिक सर्वोच्च मानल्या जाते. या विद्यापीठाचे अध्यक्ष ब्लादमीर पुतीन असून ते रशियाचे राष्ट्राध्यक्ष आहे. त्यामुळे अशा किर्तीमान रशियन विद्यापीठाशी श्री हव्याप्र मंडळाशी शैक्षणिक क्रीडा करार देशासह अमरावतीकरांकरीता अभिमानाची बाब ठरत आहे.