अमरावती : जिल्ह्यातील ५५३ ग्रामपंचायतींसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. यातील १६ ग्रामपंचायती अविरोध निवडून आल्या आहेत. त्यामुळे ५३७ ग्रामपंचायतीसाठी मतदान घेण्यात आले. या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता सत्तास्थापनेच्या तडजोडीच्या हालचालींना वेग आला आहे. काठावर बहुमत असणाऱ्यांनी सावधानता म्हणून आपल्या सदस्यांना एकत्र ठेवण्यासाठी सहलीवर पाठविण्याचे नियोजन केले आहे.
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमुळे जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. स्थानिक सोयीनुसार एकत्रित येऊन आघाड्या झाल्याने पक्षीय राजकारणाची किनार फारशी दिसली नाही. मात्र, भाऊबंदकी उफाळून आल्याने निवडणुकीची ईर्षा पाहावयास मिळाली. निवडणूक झालेल्या ५३७ ग्रामपंचायतींपैकी बहुतांश ठिकाणी काठावर बहुमत मिळाले आहे. काही ठिकाणी त्रिशंकू अवस्था झाली आहे. याठिकाणी सरपंच निवडीपर्यंत सदस्य सांभाळण्याची कसरत करावी लागणार आहे. सध्या सरपंचपदाचे आरक्षण काढायचे आहे. आरक्षण काढल्यानंतर सदस्यांना सभेची नोटीस पाठविल्यानंतर सरपंचपदासाठी निवडणूक होणार आहे. सरपंच निवडीपर्यंत फाटाफूट होऊ नये, यासाठी पॅनेलप्रमुखांकडून दक्षता घेतली आहे. तर जिथे काठावर बहुमत आहे त्या ठिकाणी गळाला कोणी जाणार नाही, यासाठी ही खबरदारी घेतली जात आहे.
बॉक्स
सरपंच आरक्षण सोडत २७ नंतर !
ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात आली आहे. आता सगळ्यांचे डोळे सरपंच पदाच्या आरक्षणाकडे लागले आहे. मंगळवारी दिवसभर निवडणूक शाखेतर्फे विजयी उमेदवारांची पडताळणी करून त्यांची नावे जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू होती. अशातच आता शनिवार, रविवारी सुट्टी व प्रजासत्ताक दिन असल्यामुळे सुट्टी आहे. त्यामुळे २७ तारखेनंतर सरपंच आरक्षण सोडत तारीख जाहीर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
बॉक्स
अपक्षांचा भाव वधारला
अनेक गावांत अपक्षांच्या हाती सत्तेची चावी असल्याने त्यांचा भाव चांगलाच वधारला आहे. सरपंच, उपसरपंचपदावर दावा सांगितला जात आहे किंवा अर्थकारणावरही तडजोडी सुरू आहेत.
बॉक्स
प्रशासकांच्या हस्तेच यंदाचे ध्वजारोहण
मुदत संपलेल्या ५५३ ग्रामपंचायतींवर सध्या प्रशासक आहेत. एप्रिल महिन्यापासून प्रशासन कामकाज पाहत असून मंगळवार २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त त्यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे.