अमरावती : कोरोना महासंकट व विविध अडचणींवर खंबीरपणे मात करत विकासाची प्रक्रिया गतिमान करण्यात आली आहे. समाजातील वंचित, गरीब, महिला, अनाथ, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, कष्टकरी अशा विविध घटकांसह सर्वसमावेशक व सर्वांगीण विकासाचा हा प्रवाह एकजुटीने पुढे नेऊया. देश व महाराष्ट्र अधिक सशक्त, बलशाली व विकसित करण्याचा निर्धार या स्वातंत्र्य दिनानिमित्त करूया, असे आवाहन पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी रविवारी येथे केले.
भारतीय स्वातंत्र्याच्या ७४ व्या वर्धापनदिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात ध्वजारोहण पालकमंत्री ठाकूर यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. राष्ट्रध्वज वंदन व राष्ट्रगीतानंतर पालकमंत्र्यांनी सर्व उपस्थितांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी यावेळी जिल्ह्यातील समस्त नागरिकांना शुभेच्छा देत संबोधित केले.
मुख्य ध्वजारोहण सोहळ्याला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलू देशमुख, माजी लेडी गव्हर्नर कमलताई गवई, विभागीय आयुक्त पीयूष सिंह, पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीना, जिल्हाधिकारी पवनीत कौर, मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह, पोलीस अधीक्षक डॉ. हरी बालाजी एन., एसआरपीएफ समादेशक हर्ष पोदार, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, उपायुक्त संजय पवार, गजेंद्र बावणे, अजय लहाने, विजय भाकरे, सहायक आयुक्त विवेकानंद काळकर, विजय जाधव, तहसीलदार वैशाली पाथरे, निकिता जाधव, पालकमंत्र्यांचे ओएसडी प्रमोद कापडे, रवी महाले, अरविंद माळवे, अमोल साबळे आदी उपस्थित होते.
--------------
तिसरी लाट रोखण्यासाठी सज्ज
संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठीही शासन- प्रशासन सुसज्ज असून, समाजातील वंचित, गरीब, अनाथ, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, महिला या सर्वांच्या विकासासाठी सर्वसमावेशक विकास प्रक्रियेला महाविकास आघाडी शासनाने गती दिली आहे, असे त्यांनी सांगितले. कोरोनाकाळात निर्माण करण्यात आलेल्या विविध रुग्णालये, लॅब, ऑक्सिजन प्लान्ट, लसीकरण, सर्वेक्षण मोहीम आदींबाबतही त्यांनी माहिती दिली.