अमरावती : जातवैधता प्रमाणपत्र मिळवून देण्याच्या मोबदल्यात आठ हजार रुपये लाच स्वीकारणाऱ्या एका सफाई कामगाराला मंगळवारी रंगेहाथ पकडण्यात आले. त्याच्यासोबत एका खासगी इसमाला देखील ट्रॅप करण्यात आले. जुना बायपासस्थित अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयासमोरच्या पानटपरीवर एसीबीने हा सापळा यशस्वी केला.
दयानंद राजसिंग डीक्का (३४, जुनी वस्ती बडनेरा) असे लाचखोर सफाई कामगाराचे नाव आहे. तर ती रक्कम स्वीकारणाऱ्या सय्यद अन्सार सय्यद लतिफ (३२, चपराशीपुरा) याला देखील ताब्यात घेण्यात आले. डिक्का याची मूळ नियुक्ती धारणी तालुक्यातील टिटंबा शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत आहे. अंजनगाव येथील यातील तक्रारदाराने जातवैधता प्रमाणपत्राकरिता अर्ज केला आहे. तो अर्ज तेथून येथील अनुसूचित जमाती जात पडताळणी समिती कार्यालयात पाठविण्यात आला. त्याचा पाठपुरावा करण्याकरिता येथील कार्यालयात गेले असता तेथील कर्मचारी दयानंद डिक्का याला भेटले, तेव्हा डिक्का याने तक्रारदाराला जातवैधता प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी १० हजार रुपयाची मागणी केली. तशी तक्रार त्यांनी एसीबीकडे नोंदविली. पडताळणी कारवाई दरम्यान देवानंद डिक्का याने तडजोडीअंती आठ हजार लाच स्वीकारण्याचे मान्य केले. त्यानुसार ६ जून रोजी सापळा रचण्यात आला. डिक्का याने तक्रारदाराकडे आठ हजार रुपये लाच मागून ती रक्कम पान टपरीचालक सय्यद अन्सार याच्यामार्फत स्वीकारली. एसीबीचे पोलिस निरीक्षक केतन मांजरे व प्रवीण पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.