लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : भविष्यातील विजेची वाढती मागणी लक्षात घेता अतिरिक्त वीज निर्मिती ३५ हजार मेगावॅट वहन क्षमतेच्या ग्रीड निर्मितीचे आव्हान आम्ही स्वीकारले आहे. वीज सेवेतील गत चार वर्षांतील लोककल्याणकारी सुधारणांप्रमाणेच हे कामही यशस्वीपणे पूर्ण करू, पाच वर्षांत साडेसात लाख शेतकऱ्यांना वीजजोडण्या देण्याचे काम सरकारने केले आहे. यंदा शेतकऱ्यांची स्थिती बिकट असल्याने ४२ लाख शेतकऱ्यांकडे २७ हजार कोटींची वीज थकबाकी असतानाही एकाही शेतकऱ्याचे वीज कनेकशन कापलेले नाही, असे प्रतिपादन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.ते येथील पॉवर हाऊस परिसरात महापारेषण कंपनीच्या 'प्रकाश सरिता' या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटनप्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषिमंत्री अनिल बोंडे होते. खासदार नवनीत राणा, उपमहापौर संध्या टिकले, नगरसेवक सुरेखा लुंगारे, कंपनीचे मुख्य अभियंता भाऊराव राऊत, सतीश अणे, महावितरणचे प्रादेशिक संचालक दिलीप घुगल, मुख्य अभियंता सुचित्रा गुजर, अधीक्षक अभियंता प्रफुल्ल अवघड, अविनाश शिंदे, गोविंद जाधव, सुधीर ढवळे, प्रवीण देशमुख, दिलीप खानंदे, अनिल वाकोडे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. वीज अभियंता बेरोजगारांच्या १२ आठवड्यांच्या प्रशिक्षणाचा शुभारंभही यावेळी झाला. अमरावती विभागाचे काम राज्यात अव्वल आहे. विभागात महावितरणने ३४ उपकेंद्रे उभी केली आहेत. सुमारे ७०० कोटी रुपयांची कामे झाली. मेळघाटात मध्य प्रदेशातून वीज आणली. अजून २४ गावांत वीज पोहोचायची आहे. सध्या तिथे सौर ऊर्जा यंत्रणा पुरविण्यात आली आहे. सौर ऊर्जेला चालना देण्यासाठी सुमारे सव्वादोन लाख रुपयांचा सौर पंप केवळ १६ हजार रुपये दरात शेतकरी बांधवांसाठी उपलब्ध करून दिल्याचे ना. बावनकुळे म्हणाले. कार्यक्रमाचे संचालन जयंत वाघमारे यांनी केले.
३५ हजार मेगावॅट क्षमतेच्या ग्रीड निर्मितीचे आव्हान स्वीकारले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2019 11:41 AM
यंदा शेतकऱ्यांची स्थिती बिकट असल्याने ४२ लाख शेतकऱ्यांकडे २७ हजार कोटींची वीज थकबाकी असतानाही एकाही शेतकऱ्याचे वीज कनेकशन कापलेले नाही, असे प्रतिपादन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
ठळक मुद्देमहापारेषणच्या इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी माहिती