दिलासा : लाभ घेण्याचे तहसीलदारांचे आवाहनचांदूरबाजार : मागील तीन वर्षापासून सातत्याने दुष्काळाच्या गर्गेत सापडलेल्या शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. यंदाचा खरीप हंगाम उभा करण्याचीही त्याची अवस्था नाही. काही दिवसावर येऊन ठेपलेल्या खरीप हंगामात, हंगाम उभा करण्यासाठी शेतकऱ्याला आर्थिक अडचण येऊ नये यासाठी जिल्हाभरात ‘सुलभ खरीप पीक कर्ज अभियान’ राबविण्यात येत आहे. तरी या अभियानात तालुक्यातील शेतकरऱ्यांनी सहभागी होऊन सुलभ पीक कर्ज वाटपाचा लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार शिल्पा बोबडे यांनी केले आहे. शेतकऱ्यांना खरीपाच्या पेरणीकरीता आर्थिक मदतीचा हात देण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. त्या अनुषंगाने आदेशही निर्गमीत केले आहे. शासनाच्या त्या आदेशाच्या नियम व अटींच्या आधिन राहून जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी अमरावती जिल्ह्यासाठी सुलभ खरीप पीक कर्ज अभियान जिल्हाभर राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या अभियानाला सुलभ खरीप पीककर्ज अभियान २०१६ असे संबोधिण्यात येणार आहे. अंमलबजावणी होण्यासाठी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. यात समिती सदस्य म्हणून तालुका कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी, तालुक्यातील सर्व बँक व्यवस्थापक, सर्व मंडळ अधिकारी, सर्व कृषी पर्यवेक्षक इत्यादींचा समावेश आहे. या समितीची तहसीलदार यांचे अध्यक्षतेखाली नुकतीच २ मे रोजी पहिली सभा होऊन कर्ज वितरणाच्या बाबतीत सर्व स्पष्ट सूचना बँक अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. तसेच या अभियानाचा आढावा घेण्यासाठी, प्रस्तुत समितीची आढावा बैठक प्रत्येक शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता तहसील कार्यालयात येईल, असेही सभेत ठरविण्यात आले आहे.त्याचप्रमाणे या सभेत सुलभ कर्ज अभियान २०१६ ची व्यापकता वाढवावी, यासाठी अभियानाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याचा निर्णयही घेण्यात आला. त्यासाठी बँकांनी गावांमध्ये पीककर्ज अभियानासंबंधी मेळावे घेण्याच्या सूचनाही बँकांना देण्यात आल्या आहेत. (तालुका प्रतिनिधी)
शेतकऱ्यांसाठी सुलभ पीककर्ज अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2016 12:12 AM