चांदूर रेल्वे : तालुक्यातील पळसखेडजवळ दुचाकी अनियंत्रित होऊन अपघात झाल्याची घटना रविवारी दुपारी ३ च्या सुमारास घडली. यामध्ये एक ठार, तर दोन जण जखमी झाले. प्रवीण मारोतराव मुळे (३५, रा. पडेगाव ता. देवळी जि. वर्धा) असे मृताचे नाव आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रवीण मुळे, प्रकाश गिरडकर व रामेश्वर गिरडकर हे तिघे दुचाकी (एमएच २७ बीटी २४७०) ने चांदूर रेल्वेहून येणस येथे जात होते. पळसखेडजवळ वळणावर भरधाव दुचाकी अनियंत्रित झाली व रस्त्याच्या कडेला तिघेही पडले. यामध्ये चालक प्रवीण मुळे यांचा मृत्यू झाला, तर मागे बसलेले प्रकाश गिरडकर (रा. येणस) व रामेश्वर गिरडकर (रा. सोनोरा भिलटेक) हे जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक गणेश मुपडे, चालक जगदीश राठोड व इतर पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनाकरिता चांदूर रेल्वे येथील ग्रामीण रुग्णालयात आणला, तर जखमींना अमरावती येथील रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. पोलिसांनी मृताविरुद्ध भादंविचे कलम २७९, ३३७, ३३८, ३०४ अन्वये गुन्हा दाखल केला.