लोकमत न्यूज नेटवर्क बडनेरा : एक्स्प्रेस हायवेवरील वरुडानजीकच्या उड्डाणपुलावर शनिवारी मध्यरात्रीनंतर २ च्या सुमारास झालेल्या अपघातात चारचाकी वाहनातील तिघांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ट्रकचे बफर अपघातग्रस्त वाहनात फसले होते. बडनेरा पोलिसांनी अज्ञात वाहनाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिस सूत्रांनुसार, ऋषिकेश ज्ञानेश्वर कराळे (२८), अजय रामखिलावन यादव (३२, दोघेही रा. अर्जुननगर, अमरावती), रजत मेश्राम (३२, रा. माहुली जहागीर) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहे. सुमित लक्ष्मण गोंदूरवार (३०, रा. अर्जुननगर, अमरावती) हा युवक गंभीर जखमी झाला आहे. हे चौघेही एमएच २७ डीएल ६६९९ क्रमांकाच्या कारने लोणी गावाकडून अमरावतीच्या दिशेने एक्स्प्रेस हायवेवरून येत होते. वरुडा गावानजीक हा अपघात घडला. परिसरातील लोकांनी अपघाताची माहिती बडनेरा पोलिसांना दिली यानंतर तत्काळ पोलिस व अॅम्ब्युलन्स घटनास्थळी दाखल झाले. दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर एकाचा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. चौघेही परस्परांच्या ओळखीतील होते.
चारचाकी फेकली गेली दुसऱ्या बाजूला अपघातग्रस्त वाहन रस्त्याचे दुभाजक ओलांडून दुसऱ्या बाजूने फेकले गेले. चालक तसेच बाजूला बसलेला युवक केबिनमध्ये फसले होते. पोलिसांनी रक्तबंबाळ झालेल्या या दोघांना बाहेर काढले. सहायक पोलिस निरीक्षक संदीप हिवाळे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात वाहनाविरुद्ध गुन्हा नोंदविला.
ट्रकचे बफर फसले अपघात चारचाकीच्या समोरच्या भागात नेमप्लेट असलेले बफर फसले होते. हे बफर दुसऱ्या वाहनाचे असल्याचे लक्षात आल्यानंतर बडनेरा पोलिसांनी नांदगाव पेठ टोल नाक्यावर सीसीटीव्ही तपासले तेव्हा ते बफर एका ट्रकचे असल्याचे निदर्शनास आले