अमरावती : विदर्भाची पंढरी असलेल्या तिवसा तालुक्यातील श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथील देवी रुक्मिणीच्या पादुका असणाऱ्या पालखीला गुरूवारी रात्री पंढरपूर नजीक आढीव गावाजवळ अपघात झाला. जेवण करून रात्रीच्या विश्रांतीला वारकरी रस्त्याने जात असताना पालखीसमोर ट्रकने इंडिकाला धडक दिली. या अपघातामधील इंडिका फिरून पालखीत शिरली. या अपघातात २ वारकरी ठार व ३ जखमी झाले आहे. मृतामध्ये तिवसा तालुक्यामधील मार्डा येथील इंदुमती धोत्रे (६४) व उमेश बावनथडे (३५, रा. मार्डी) यांचा समावेश आहे. अपघातामध्ये जखमी झालेल्या ३ वारकऱ्यांवर सोलापूर रुग्णालयात उपचार सुरू आहे. कौंडण्यपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी देवस्थानचे अध्यक्ष वासुदेवराव दोड यांनी सांगितल्यानुसार संत सदाराम महाराजांनी ४१९ वर्षांपूर्वी ही पालखी सुरू केली होती. यावर्षी हभप रंगराव महाराज टापरे यांच्या नेतृत्वात दि. १ जून २०१४ पालखीची सुरवात झाली. यावेळी पालखीत ४० वारकरी होते. गावागावात वारकरी जुळत गेल्याने ही संख्या १४० वर गेली. पंढरपूरच्या काही किलोमीटर अगोदर आढीव या गावामध्ये गुरूवारी रात्री जेवण करून गावाबाहेर अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या शाळेत विश्रांती वारकरी जात असताना समोरील भागात ट्रकने इंडीकाला धडक दिली. ही इंडिका फिरून मागे आली व पालखीवर धडकली. यामध्ये २ वारकरी ठार झालेत. मृतकांना शुक्रवारी सायंकाळी अमरावती येथे आणण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
कौंडण्यपूरच्या पालखीला पंढरपूरजवळ अपघात
By admin | Published: July 05, 2014 12:30 AM