- मोहन राऊत
धामणगाव रेल्वे : रायपूर येथून शिर्डीला दर्शनाला जात असताना गाडीचा वेग नियंत्रणात न आल्याने धामणगावनजीक समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात रायपूर येथील कापड व्यापारी जागीच ठार झाले, तर तिघे जण किरकोळ जखमी झाले. ही घटना रविवारी पहाटे चार वाजता घडली.
दिनेश दौलत पंजवाणी वय ३७ वर्ष (रा . खिलोना फॅक्टरी, साईनगर, जेल रोड, रायपूर) असे मृताचे नाव आहे. वाहन तेच चालवित होते. मनीष पंजवाणी (३३), प्रदीप जगन्नाथ चांदवानी (४५), विकास जानवाणी (२३. सर्व रा. रायपूर) असे जखमीचे नाव आहे. हे चारही जण रायपूर येथून शनिवारी रात्री ९ वाजता सीजी ०४ एनके ७५०० क्रमांकाच्या वाहनाने शिर्डी येथे दर्शनाला निघाले होते. समृद्धी महामार्गावरील १२३ चेन गेटजवळील मोगरा-धोत्रा गावानजीक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. यात दिनेश जागीच ठार झाला.
या घटनेची माहिती बडनेरा पोलीस वाहतूक महामार्गाला माहिती होताच पोलीस निरीक्षक शेख तसेच तळेगाव दशासर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तिघे किरकोळ जखमी असल्याने त्यांना नांदगाव खंडेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयातून उपचारानंतर सुटी देण्यात आली. धामणगाव रेल्वे येथील ग्रामीण रुग्णालय येथे झाल्यानंतर दिनेश पंजवाणी यांचे पार्थिव चांदूर रेल्वे येथील सिंध मंडळाचे अध्यक्ष नंदाशेठ वाधवानी, धामणगाव रेल्वे नगर परिषदेचे माजी सदस्य अशोक बुधलानी यांनी सामाजिक वारसा जोपासत रायपूर येथे पाठविण्याची व्यवस्था केली तसेच जखमींना आधार दिला. समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच असल्याचा दुजोरा या घटनेने मिळाला.