महापालिकेचे राजापेठ, राजकमल चौक, इतवारा बाजारात रॅपिड ॲन्टिजेन तपासणी, ३३८ पैकी एक जण पॉझिटिव्ह
अमरावती : संचारबंदी असताना विनाकारण बाहेर फिरणे, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची शुक्रवारी आकस्मिक कोविड चाचणी करण्यात आली. मोबाईल व्हॅनद्धारे राजापेठ, इतवारा बाजारात रॅपिड ॲन्टिजेन तपासणी करून १० मिनिटांतच नागरिकांना अहवाल देण्यात आला. महापालिका प्रशासनाच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविला गेला. ३३८ व्यक्तींनी कोराना चाचणी केल्यानंतर एक जण पॉझिटिव्ह आढळून आला. दरम्यान जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी भेट देऊन कोविड चाचणीचा आढावा घेतला.
महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांच्या निर्देशानुसार अमरावती महापालिका व पोलीस विभागाद्वारे संयुक्त कारवाई करून विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची रॅपिड ॲन्टिजन टेस्ट करण्यात आली. कोरोना तपासणी वाहन चौका-चौकांत उभे करून कोरोना तपासणीचे आवाहन महापालिकेच्यावतीने ध्वनीक्षेपकाद्वारे नागरिकांना करण्यात आले. विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाईचा इशाराही यावेळी देण्यात आला. व्यापारी व नागरिकांची कोविड चाचणी महापालिकेच्यावतीने ही तपासणी मोहीम राबविली जात असल्याचे उपायुक्त रवि पवार यांनी सांगितले. मास्क न लावणे, शारीरिक अंतराचे पालन न करणे, जास्त प्रवासी असलेल्या वाहनांवर यावेळी कारवाई करण्यात आली. यावेळी फुटपाथवरील विक्रेते, ऑटोरिक्षा चालक, अत्यावश्यक सेवा कर्मचारी व इतर वाहनचालकांची कोरोना तपासणी करण्यात आली. ऑटोरिक्षातील प्रवाशांची कोरोना तपासणी करण्यात आली. यावेळी उपायुक्त रवि पवार, राजापेठचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे, सहायक आयुक्त नरेंद्र वानखडे, संदीप पाटबागे, जनसंपर्क अधिकारी भूषण पुसतकर, स्वास्थ्य निरीक्षक विजय बुरे, स्वास्थ्य निरीक्षक मनीष हडाले, प्रीती दाभाडे, राजापेठ येथील पोलीस कर्मचारी उपस्थित होते. राजापेठ येथे १०७, राजकमल चौकात ९१, तर इतवारा बाजारात १४० व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली.