अंत्यसंस्काराला पोलीस दलाच्या पथकाने दिली सलामी : दु:खाचे सावट !
वरूड/शेंदूरजनाघाट : शेंदूरजनाघाट पोलीस ठाण्यातून आरोपी घेऊन जाणाऱ्या वाहनाला अपघात झाल्याने त्यामधील गृहरक्षक दलाचे सैनिक संतोष राधेश्याम मरकाम (२२, रा. मलकापूर) हे गंभीर जखमी झाले होते. नागपूरला उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. कर्तव्यावर असताना झालेल्या अपघातामुळे संतोष मरकाम यांचा अख्खा परिवार हादरून गेला. आई, वडील, भाऊबंद अगदी स्तब्धच झाले होते.
होळीच्या दिवशी नागपूरहून कलेवर मलकापुरातील घरी आणताच एकच हंबरडा फुटला. सजविलेल्या ट्रॅक्टरवरून अंत्ययात्रा काढून ‘संतोष अमर रहे’च्या घोषणेत पार्थिव स्मशानभूमीत नेण्यात आले. यावेळी अमरावती येथून आलेल्या पोलीस दलाच्या जवानांनी हवेत तीन फैरी झाडून सलामी दिली. उपस्थित शेकडो नागरिकांनी साश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला. अत्यंत गरिबीतून आई, वडील आणि तीन भाऊ, तीन बहिणींचा मोलमजुरी करून सांभाळ करणारे व घरातील मोठा मुलगा असणारे संतोष हे २०१९ मध्ये होमगार्ड म्हणून भरती झाले. २७ मार्च रोजी सकाळी ११.३० वाजता बलात्कार प्रकरणातील एका आरोपीला अमरावती जिल्हा न्यायालयात घेऊन जाताना बारागावनजीक पोलीस वाहनाला अपघात झाला. यामध्ये संतोष मरकाम हे गंभीर जखमी झाले होते.
अंत्यसंस्काराला आमदार देवेंद्र भुयार, पंचायत समिती सभापती विक्रम ठाकरे, नगराध्यक्ष रूपेश मांडवे, उपाध्यक्ष सुभाष गोरडेसह नगरसेवक तसेच पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. पोलीस उपनिरीक्षक साची कानडे, लक्ष्मण साने, निकेश गाढवे, स्वप्निल बायस्कर, पंकज गावंडे, रत्नदीप वानखडे, बन्सी पानझाडे तसेच शेंदूरजनाघाट पोलिसांसह वरुड, बेनोडा येथून आलेल्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी श्रद्धांजली वाहिली.
-