अमरावती : मान्सून कालावधीत नागरिकांना त्वरित मदत प्राप्त व्हावी, यासाठी १ जूनपासून जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात २४ बाय ७ नियंत्रण कक्ष सुरू होत आहेत. या ठिकाणी फोन ड्युटीवर सर्व विभागातील कर्मचाऱ्यांची रात्रपाळीत नियुक्ती केल्या जात आहे. शासनाचे लेखी १ जूनपासून पावसाळा सुरू होत असून ३० सप्टेंबरपर्यंत प्रशासन अलर्ट मोडवर राहणार आहे.
जिल्ह्यातील ४८२ गावे नदी- नाल्यांमुळे प्रभावित होत असल्याने पावसाळ्याचे कालावधीत नियंत्रण कक्षाची भूमिका महत्त्वाची आहे. या कक्षात रोज रात्री दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती केल्या जाते. याशिवाय १४ ही तहसील कार्यालयात कर्मचारी नियुक्त केल्या जातात. जिल्हास्तरावर निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती प्राधिकरण विवेक घोडके यांची जिल्हा नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे.
आपत्कालीन परिस्थितीत पाणीपुरवठा, जिल्हा पुरवठा अधिकारी, शोध व बचाव साहित्य, विद्युत पारेषण यासोबतच अन्य विभागाची महत्त्वाची भूमिका आहे. याशिवाय महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद स्तरावरही नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आलेले आहे. मान्सूनपूर्व तयारीचे अनुषंगाने विभागीय आयुक्तांनी ३१ मे रोजी व जिल्हाधिकाऱ्यांनी १६ मे रोजी तयारीचा आढावा घेतला आहे.