जिल्हा परिषद : गॉडफादरची हिरवी झेंडी अमरावती : जिल्हा परिषदेत उपाध्यक्षासह दोन विषय समितीच्या सभापतींना खातेवाटप करण्यासाठी २१ एप्रिलपूर्वी विशेष सर्वसाधारण सभा घेणे आवश्यक आहे. त्यानुसार खातेवाटपासाठी १८ एप्रिलचा मुहूर्त निघाला आहे. यासभेला सत्ताधारी पक्षाच्या ‘गॉडफादर’ने हिरवी झेंडी दिल्यामुळे सभेचा मार्ग मोकळा झाला असला तरी सभेच्या नोटशीटवर केवळ अध्यक्षांची मोहोर उमटण्याची औपचारिकता बाकी आहे.जिल्हा परिषद उपाध्यक्ष व दोन विषय समिती सभापतींना खातेवाटप करण्यासाठी विशेष सर्वसाधारण सभा घेणे आवश्यक आहे. चार विषय समिती सभापतीपदासाठी ३ एप्रिल रोजी निवडणूक घेण्यात आली. यामध्ये समाज कल्याण सभापतीपदी सुशीला कुकडे, महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी वनिता पाल यांची निवड झाली. मात्र, यासोबत दोन विषय समितींच्या सभापतीपदी काँग्रेसचे जयंत देशमुख आणि रिपाइंचे बळवंत वानखडे यांची निवड झाली आहे. मात्र, या दोघांसह उपाध्यक्ष दत्ता ढोमणे यांना खातेवाटप झाले नाही. नियमानुसार सभापतींची निवड झाल्यानंतर महिनाभराच्या आत खातेवाटप करणे अपेक्षित आहे. त्यामुळे २१ एप्रिलपर्यंत विशेष सर्वसाधारण सभेत खातेवाटप करण्यासाठी १८ एप्रिल रोजी विशेष सभा होणार आहे. त्यासाठी प्रशासकीय कार्यवाही सुरू असून अध्यक्षांकडे हे फाईल स्वाक्षरीसाठी पाठविले जाणार आहे. उपाध्यक्षासह दोन सभापतींना विशेष सर्वसाधारण सभेत जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे खातेवाटप करणार आहेत. त्यामुळे आता यासर्वसाधारण सभेत उपाध्यक्ष दत्ता ढोमणे, सभापती जयंत देशमुख आणि बळवंत वानखडे यांना खातेवाटप होणार आहे. (प्रतिनिधी)
खातेवाटपास १८ एप्रिलचा मुहूर्त
By admin | Published: April 10, 2017 12:20 AM